News Flash

एप्रिलचा उन्हाळा पुणेकरांसाठी सुसह्य

पावसाळी वातावरणाच्या काळात तापमानाच्या पाऱ्यात काही प्रमाणात घट झाली.

(संग्रहित छायाचित्र)

आठ वर्षांनंतर प्रथमच कमाल तापमान ४० अंशांखाली

पुणे : निरभ्र आकाशामुळे जाणवणारा उन्हाचा चटका… ढगाळ स्थितीमुळे रात्रीचा उकाडा… आदी सर्व गोष्टी पुणेकरांनी एप्रिल महिन्यात अनुभवल्या असल्या, तरी तापमानाच्या नोंदींनुसार एप्रिलमधील उन्हाळा सुसह््यच झाला असल्याचे म्हणावे लागेल. कारण या संपूर्ण महिन्यात शहरातील मध्यवर्ती भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअर्स किंवा त्यापुढे जाऊ शकला नाही. आठ वर्षांनंतर प्रथमच शहरातील पारा एप्रिलमध्ये ४० अंशांखालीच राहिला. ढगाळ स्थिती आणि पावसाळी वातावरणाचाही हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.

एप्रिल महिन्यात अनेकदा शहरातील दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेल्याचे तापमानाच्या नोंदींवरून दिसून येते. मात्र, यंदा आठ वर्षांनंतर त्यात खंड पडला. एप्रिलच्या सुरुवातीला राज्याबरोबरच पुणे शहर आणि परिसरातील तापमानात वाढ झाली होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत असलेल्या कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंशांवर गेला. त्यामुळे यंदाच्या हंगामातील तीव्र उन्हाचा चटका या काळात पुणेकरांनी अनुभवला. मात्र, १० एप्रिलनंतर हवामानात झपाट्याने बदल होत गेला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह शहरालाही पूर्वमोसमी पावसाचे संकेत मिळाले. पुण्यात १४ एप्रिलला ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरीही लावली.

पावसाळी वातावरणाच्या काळात तापमानाच्या पाऱ्यात काही प्रमाणात घट झाली. या काळात रात्री ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने किमान तापमानात वाढ होऊन ते २२ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. या काळात रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली. १७ ते १९ एप्रिल या काळात अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती दूर होऊन पुन्हा निरभ्र आकाश निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून दिवसाच्या तापमानात वाढ सुरू झाली. १९ ते २३ एप्रिल या कालावधीत तापमानात वाढ कायम राहिली. शहरातील तापमान नोंदीचे मुख्य केंद्र असलेल्या शिवाजीनगर केंद्रामध्ये या काळात ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदविले गेले. मात्र, तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसचा टप्पा पार करू शकला नाही. एप्रिल महिन्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान या काळात नोंदविले गेले.

मे महिन्याचा पहिला आठवडा कसा?

शहरात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अंशत: ढगाळ वातावरण आणि पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. २ मे रोजी शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली. ३८ अंशांवर असलेले कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी होऊन ३६ अंशांपर्यंत खाली आले. शहर आणि परिसरात पुढील चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. या काळात तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, अशी शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:02 am

Web Title: april summer is bearable akp 94
Next Stories
1 रेमडेसिविर पुरवणाऱ्या कंपनीवरील बंदी उठवली
2 नागरिकांना धान्य मिळण्यात अडचणी
3 करोनाच्या दुसऱ्या लाटेचा बासमतीला फटका
Just Now!
X