डॉ. म. के. ढवळीकर (पुरातत्त्वशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक)

कोणत्याही पुस्तकाचे सखोल वाचन केल्यास आपल्याला त्यातील चुका आणि दोष समजू शकतात. ज्याला संशोधन करावयचे आहे, अशा व्यक्तीने सातत्याने वाचन करायला हवे. वाचताना आपल्याला प्रश्नच पडले नाहीत, तर कोणत्याही विषयाचे संशोधन करणे अशक्य आहे. कोणतेही संशोधन किंवा उत्खनन करताना त्या ठिकाणाचा इतिहास, भूगोल आणि परिस्थितीचा अभ्यास करणे, मला नेहमीच गरजेचे वाटले. त्यामुळे केवळ देशभर नव्हे, तर जगभरातील ऐतिहासिक ठिकाणांबद्दल पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी पुस्तकांतून शोधू शकलो. म्हणूनच, वाचन हा माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या उत्खनन मोहिमा आणि व संशोधनात यशस्वी होण्याचा राजमार्ग असावा.

वयाच्या ८८ व्या वर्षी मागे वळून पाहिले, तर लहानपणी किती वाचन केले असेल, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळेल. आमच्या घरामध्ये वाचनाचे फारसे वातावरण नव्हते. एवढी पुस्तकेही उपलब्ध नव्हती. आमच्या घराशेजारीच असलेल्या रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. त्या वेळीही वाचनाशी फारसा संबंध आला नाही. मात्र, इयत्ता पाचवीमध्ये मोहिनी घाणेकर बाई यांनी माझ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण केली. त्या मला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके घरी वाचायला देत. मी दुसऱ्याच दिवशी वाचून त्यांना परत देत असे. दिवाळी अंक आणि मासिके वाचण्याचा छंदही मला लागला. ही वाचनाची आवड पुढे अधिकच वाढत गेली. फग्र्युसन महाविद्यालयामध्ये असताना दोन-तीन मित्र एकत्रित वाचन करीत असू. त्या वेळी पुणे नगर वाचन मंदिराचे सभासद झालो होतो. ज्या लेखकाच्या पुस्तकांची यादी आम्हाला मिळायची ती सर्व पुस्तके वाचल्याशिवाय आम्ही दुसऱ्या लेखकाच्या पुस्तकांना हात लावत नसू. त्यामुळे वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. दि. माडगूळकर यांची पुस्तके वाचण्याचा आम्ही जणू सपाटाच लावला होता. नोकरी करून शिक्षण घ्यायचे, असे मी ठरविले होते. त्यामुळे गोखले इन्स्टिटय़ूटच्या ग्रंथालयात काम करायला सुरुवात केली. त्या वेळी चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचनाची गोडी मला लागली. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, बा. सी. मर्ढेकर, पु. शि. रेगे यांची नाटके आणि कविता आमच्या तोंडपाठ झाल्या होत्या.

आर्किओलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या पुण्यातील ग्रंथालयामध्ये काही महिने काम करण्याची संधी मिळाली. तेथील दीड हजार पुस्तके व्यवस्थितपणे लावून देण्याचे काम माझ्याकडे होते. त्यामुळे पुरातत्त्वशास्त्र आणि इतिहासासंबंधीची अनेक पुस्तके मी या काळात हाताळली. सहा महिन्यांकरिता असलेली ही नोकरी पुढेही सुरूच राहिली आणि मी पुरातत्त्वशास्त्राच्या क्षेत्राकडे वळालो. १९५४ मध्ये औरंगाबाद येथे उत्खननासाठी मला जाण्यास सांगण्यात आले. त्या वेळी उत्खनन पाहून आणि त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन मी भारावून गेलो. पुरातत्त्व विषयासंबंधी अधिकच आवड निर्माण झाली. ‘गॉड्स ग्रेव्हज् अँड स्कॉलर्स’ हे पुरातत्त्व क्षेत्राविषयी आवड निर्माण करणारे पुस्तक माझ्या हाती पडले आणि आपण हे काम करण्यासाठीच जन्म घेतला असल्याची जाणीव मला झाली. त्या विषयासंबंधी माझ्याप्रमाणे अनेकांना इतकी आवड निर्माण झाली, की त्या पुस्तकाच्या प्रभावाने अनेक जण वाणिज्य शाखेचा अभ्यास सोडून या क्षेत्राकडे वळाले. नंतर नोकरीच्या निमित्ताने दिल्ली येथील पुरातत्त्व खात्याच्या ग्रंथालयामध्ये मी गेलो. दररोज तीन-चार तास मी त्या पुस्तकांमध्ये अगदी समरस होत असे. माझी वाचनाची आवड पाहून तेथील ग्रंथपाल परब यांनी मला घरी वाचनासाठी पुस्तकेही देऊ केली. ‘शेरलॉक होम्स’, ‘पॅशन ऑफ द माइंड’ सारखी अनेक पुस्तके माझ्या बुकशेल्फमध्ये आजही आहेत. इंग्रजी वाचनाने लंडन, व्हिएन्ना येथे गेल्यानंतर त्या पुस्तकातील पात्रांची घरे शोधण्यापर्यंत मला वेड लावले होते. लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीसह अमेरिकेतून अनेक पुस्तके मी माझ्या संग्रहात जमा केली. उत्खननाच्या निमित्ताने काश्मीर ते रामेश्वपर्यंतचा प्रवास केला. त्या वेळी ठिकठिकाणी मिळालेल्या पुस्तकांचे वाचन करून त्या आधारे मी विविध प्रकारचे संदर्भ गोळा करू शकलो.

घोडनदीच्या काठावर (ता. शिरूर) असलेल्या इनाम या गावी मी १८ वर्षे उत्खनन केले. त्या वेळी भारतीय साहित्यासह अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या पुस्तकांचा आधार घेतला होता. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी कशा प्रकारचे खेडे होते, येथील लोकांचे जेवण कसे होते, शिकार कशी होत असे, अशा अनेक गोष्टींचा शास्त्रशुद्ध शोध लावण्याचा प्रयत्न मी केला. या उत्खननाशी संबंधित असे ‘द फर्स्ट फार्मर्स ऑफ द डेक्कन’ या पुस्तकांचे लेखन मी केले. या विषयावर अमेरिका, लंडन येथील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात. त्यामुळेच वाचनाने माणूस किती समृद्ध होऊ शकतो आणि त्याच्या हातून कोणतेही कठिण कार्य कसे सहज होऊ शकते, याची अनुभूती मला मिळाली. यासोबतच सिंधू संस्कृती आणि इंडो आर्यन भाषेच्या विकासाबद्दल मी खूप वाचन केले. कोणत्याही विषयासंबंधी आपल्याला प्रश्न पडू लागले की त्या उत्कंठेपोटी आपण शोध सुरू करतो. हा शोध घेताना वेगवेगळी पुस्तकेच आपल्याला वाटाडय़ाप्रमाणे मार्गदर्शन करतात.

माझ्या बुकशेल्फमध्ये आजमितीस शेकडो पुस्तके आहेत. त्या पुस्तकांच्या वाचनातून मी लेखनप्रवास समृद्ध करू शकलो. माझी ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ३० पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत. मी नागपूर विद्यापीठात काम केले. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि संचालक होतो. वाचनाचे मला झालेले फायदे विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी प्रयत्न केले.

डेक्कन कॉलेजच्या पूर्वीपासूनच समृद्ध ग्रंथालयात आणखी पुस्तकांची भर कशी पडेल, याकडे माझे लक्ष असे. टागोर राष्ट्रीय अभ्यासवृत्तीसाठी अर्ज केल्यानंतर मला शासनाकडून ही अभ्यासवृत्ती मिळाली. दोन वर्षे काम करून ‘कल्चरल हेरिटेज ऑफ मुंबई’ या पुस्तकाचे लेखन केले. त्यासाठी मुंबईतील अज्ञात अशा अनेक ठिकाणांना भेटी देऊन संपूर्ण इतिहास शोधून काढला. त्यानंतर ‘गणेशा-द गॉड ऑफ एशिया’ या पुस्तकामध्ये देश-विदेशातील गणेशाची स्थाने व मूर्तीविषयी लेखन केले आहे. माझ्या संपूर्ण जीवनप्रवासात प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधण्याच्या कामी मला पुस्तकांनी साथ दिली. त्यामुळे प्रत्येक संशोधकाने परिपूर्णतेचा ध्यास घेण्यासाठी पुस्तकांची कास धरायलाच हवी.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ