‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर विद्यापीठाकडून सुधारित गुणपत्रिका देण्याची कार्यवाही

पुणे : भानुबेन नानावटी वास्तुरचना महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींच्या गुणपत्रिकेवरील अनुपस्थित शेरा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बुधवारी हटवला. ‘लोकसत्ता’च्या बातमीनंतर तातडीने कार्यवाही करून विद्यार्थिनींना सुधारित गुणपत्रिका दिली. सुधारित निकालानुसार तिन्ही विद्यार्थिनी उत्तीर्ण ठरल्या.

वास्तुरचना अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षांच्या पहिल्या सत्राची परीक्षा विद्यार्थिनींनी देऊनही विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित असा शेरा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या विद्यार्थिनींनी दुसऱ्या वर्षी महाविद्यालय बदलले होते. मात्र, चौथ्या वर्षांच्या पहिल्या सत्र परीक्षेवेळी त्यांचे नाव आणि परीक्षा क्रमांक असलेले बारकोड स्टीकरच विद्यापीठाकडून उपलब्ध झाले नाहीत.

त्यामुळे महाविद्यालयाने त्यांना इमर्जन्सी बारकोड स्टीकरचा वापर करून परीक्षेला प्रविष्ट केले. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर विद्यापीठाकडून गुणपत्रिकेवर अनुपस्थित शेरा देण्यात आला होता. त्या बाबत महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडे पाठपुरावा करूनही काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. मात्र बातमीनंतर विद्यापीठ प्रशासनाने या संदर्भात तातडीने कार्यवाही केली.

‘आम्ही उत्तीर्ण होऊ याची खात्री होती. मात्र, गुणपत्रिकेवर अनुपस्थित शेरा आल्याने काय करायचे कळत नव्हते. त्यातच पुढील सत्राचा अर्ज भरण्याची मुदत निघून जात होती. सुधारित निकालात उत्तीर्ण झाल्याचे कळल्यावर अतिशय आनंद झाला,’ अशी भावना तीनही विद्यार्थिनींनी व्यक्त केली.