तुम्ही तुमची दुचाकी किंवा चार चाकी पुण्यातल्या एखाद्या ‘नो पार्किंग’ असलेल्या रस्त्यावर लावलीत, तर काय होईल? दुचाकी असेल, तर पंधरा-वीस मिनिटांमध्ये वाहूतक पोलिसांचा फिरता टेम्पो येईल आणि तुमची गाडी उचलून नेईल. तुमची चार चाकी असेल, तर क्रेन येईल आणि गाडी उचलून नेली जाईल किंवा गाडीच्या चाकाला ‘जॅमर’ लागेल. पुण्यातील सर्व रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून अशाप्रकारे कारवाई होत असली, तरी शहरातला एक रस्ता मात्र असा आहे की, या रस्त्यावर तुम्ही अगदी ‘नो पार्किंग’मध्ये जरी गाडी उभी केलीत, तरी तुमच्या वाहनावर कोणीही कारवाई करणार नाही. तुम्हाला माहिती आहे हा रस्ता?
‘नो पार्किंग’मध्ये गाडी उभी करून देखील कारवाई न होणारा हा रस्ता पहायचा असेल, तर महापालिका भवनासमोर चला. महापालिका मुख्य भवनासमोर असलेल्या या मुख्य रस्त्यावर शंभर मीटरपर्यंत म्हणजे संपूर्ण रस्त्यावरच सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई आहे. ‘शंभर मीटरपर्यंत नो पार्किंग’ असे दोन फलकही येथे अंतराअंतरावर उभे आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र रोज दिसणारे चित्र नेमके उलट आहे.
‘वाहने उभी करण्यास मनाई, शंभर मीटर’ असे सांगणाऱ्या दोन्ही फलकांना खेटूनच येथे चार चाकी गाडय़ा बिनदिक्कत उभ्या केल्या जातात आणि या रस्त्यावर गाडय़ांचे दुहेरी, तिहेरी पार्किंग केले जाते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होते. मात्र, येथे लागणाऱ्या आलिशान गाडय़ांवर कारवाईची हिंमत कोणताही अधिकारी करत नाही. यातील बहुतेक गाडय़ांवर राजकीय झेंडे वा राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह असतात. या रस्त्याच्या समोर देखील वाहने उभी करण्यास मनाई आहे. प्रत्यक्षात तेथे रोज शेकडो दुचाक्या उभ्या केल्या जातात. तेथेही कधी कारवाई होत नाही.
म्हणून कारवाई होत नाही..
महापालिका भवनासमोर ‘नो पार्किंग’मध्ये प्रामुख्याने बिल्डर, नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या गाडय़ा उभ्या केल्या जातात. अनेकदा त्यांच्या बरोबरीने शासकीय वाहनेही उभी केली जातात. अशा गाडय़ांवर कशी कारवाई होणार?
गाडी ‘पार्किंग’मध्ये का म्हणून लावायची?
महापालिका भवनाला दोन बाजूंनी गराडा घालून जे पार्किंग बेकायदेशीररीत्या केले जाते, त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी कधीही केली जात नाही. महापालिकेच्या आवारात मोठा वाहनतळ आहे. शिवाय दुचाकी आणि चार चाकींसाठी स्वतंत्र दुमजली वाहनतळ आहे. तरीही गाडी ‘पार्किंग’मध्ये कशाला लावायची, असा प्रश्न करत रस्त्यावरच पार्किंग करणाऱ्यांची आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. धनदांडग्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या गाडय़ा अनेकदा महापालिका आवारातही अशाप्रकारे लावल्या जातात की सामान्यांना तेथून चालणेही अवघड होते.