राज्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कौल दिलेला असतानाही त्यांच्याच सल्ल्यावर राज्यातील सरकार चालत आहे की काय, असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे नेते अर्जुन डांगळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला.
रिपब्लिकन जनशक्ती पक्षातर्फे पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी (२२ मार्च) येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत डांगळे यांनी राज्य शासनावर तसेच केंद्र सरकारवरही टीका केली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील कदम, शहराध्यक्ष शैलेंद्र मोरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. केंद्र आणि राज्य शासनाची धोरणे सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, ओबीसी आणि दलितांच्या हिताविरोधात आहेत, अशी टीका डांगळे यांनी यावेळी केली.
विधानसभा निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो. त्या पक्षाच्या विरोधात जनतेनेही कौल दिला. मात्र राज्यातील फडणवीस सरकार त्यांच्याच सल्ल्याने व मदतीने चालते की काय असा प्रश्न मला पडतो. राज्यातील आदिवासी, दलित, ओबीसी यांचा विकास थांबवण्याचा प्रयत्न विविध धोरणांच्या माध्यमातून केला जात आहे. मुंबईचेही महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्याकडून चालू आहेत. भूसंपादन कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसंबंधीही फक्त घोषणाच झाल्या. शेतकऱ्यांना मात्र काही मिळाले नाही, असे डांगळे यांनी या वेळी सांगितले.
रिपब्लिकन जनशक्ती हा गट नसून आंबेडकरी तरुणांना राजकीय नेतृत्व देण्यासाठीचे विचारपीठ आहे. आगामी काळात रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करू, असेही डांगळे यांनी सांगितले. शिवसेनेला आमच्या पक्षाने दिलेला पाठिंबा हा सैद्धांतिक मुद्यांवर असल्याचेही ते म्हणाले.