04 July 2020

News Flash

लोकलमधील चोरटय़ांना रोखण्यासाठी सशस्त्र बंदोबस्त

पुणे-लोणावळा या मार्गावर मोठय़ा संख्येने प्रवासी लोकलने प्रवास करतात.

रात्रीच्या वेळी पुणे-लोणावळा मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धमकावून लुटमार करणाऱ्या चोरटय़ांना रोखण्यासाठी मळवली, कान्हेफाटा, वडगांव, कामशेत, आकुर्डी या रेल्वे स्टेशनवर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय लोहमार्ग पोलिसांनी घेतला आहे. तसेच धावत्या रेल्वेगाडय़ांवर पडणारे दरोडे रोखण्यासाठी आणखी दहा ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दौंड रेल्वेस्थानकाच्या आवारात पहाटे सिग्नल नसल्यामुळे थांबलेल्या आझादहिंद एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या माय-लेकींवर चोरटय़ांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्यांच्या बॅगेतील ऐवज आणि मोबाईल लुटून नेला होता. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी पसार झालेल्या चोरटय़ांना जेरबंद केले होते. दरम्यान, धावत्या रेल्वेवर पडणारे दरोडे रोखण्यासाठी लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक विश्व पानसरे यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ात लोहमार्गालगत तात्पुरत्या स्वरुपात चाळीस ठिकाणी चौक्या उभारुन तेथे सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे-लोणावळा या मार्गावर मोठय़ा संख्येने प्रवासी लोकलने प्रवास करतात. रात्री अकरानंतर लोणावळा ते पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चोरटय़ांनी लुटल्याच्या घटना घडतात. लोहमार्गालगत राहणाऱ्या झोपडपट्टय़ांमधील चोरटे लुटमारीचे गुन्हे करतात. प्रवाशांकडील मोबाईल तसेच रोकड लांबवून चोरटे पसार होतात. त्यामुळे रात्री उशिरा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्टेशनच्या परिसरात सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे रेल्वेस्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
ते म्हणाले की, कान्हेफाटा, मळवली, कामशेत, वडगांव, आकुर्डी स्थानकाच्या लगत असलेल्या झोपडपट्टयांमध्ये चोरटे राहतात. रात्री अकरानंतर लोकलच्या डब्यांमध्ये फारशी गर्दी नसते. रेल्वे स्टेशनच्या जवळ गाडीचा वेग कमी असतो. अशा वेळी चोरटे लोकलच्या डब्ब्यात शिरुन प्रवाशांना तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून किंवा त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील ऐवज लुटतात. बऱ्याचदा प्रवासी तक्रार देखील दाखल करत नाहीत. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी तेथे सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. आठ ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये वाढ क रण्यात आली असून आणखी दहा ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बंदोबस्तामुळे लुटमारीच्या घटना कमी झाल्या आहेत, असे आमचे निरीक्षण आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
उन्हाळ्याच्या सुटीमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात वावरणारे चोरटे प्रवाशांच्या चीजवस्तू असलेल्या बॅगा लंपास करतात. लोहमार्ग पोलिसांनी भुरटय़ा चोऱ्या करणाऱ्यांवर नजर ठेवली आहे. साध्या वेशातील पोलीस पथके गर्दीच्या वेळी गस्त घालत आहेत. तसेच पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2016 5:12 am

Web Title: armed police security at railway station to prevent robbery
टॅग Robbery
Next Stories
1 ‘एकमेकींच्या आधारानेच महिला बनतील अभया’
2 पिंपरी पालिकेच्या मुख्य इमारतीत दूषित पाणीपुरवठा;
3 पालकमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर नाशिक रस्ता
Just Now!
X