बोपखलचा वर्षांनुवर्ष वापरात असलेला रहदारीचा रस्ता लष्कराकडून बंद करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याच पध्दतीने पिंपळे सौदागर ते रक्षक सोसायटी दरम्यानचा रस्ता लष्कराने मंगळवारपासून बंद केला. या मार्गावरून औंध, पुणे, वाकड, हिंजवडी आदी भागात जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून त्यांना जवळपास सहा किलोमीटरचा वळसा पडणार आहे.
लष्करी हद्दीतून जाणारे रस्ते, हा गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडलेला विषय आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव बोपखेलमधील रस्ता लष्कराने बंद केला, त्याविरुध्द ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली. तथापि, न्यायालयाने लष्कराच्या बाजूने निकाल दिल्याने तो रस्ता बंद करण्यात आला. त्याविरुध्द ग्रामस्थांनी आंदोलन केले, त्यास हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी तुफान लाठीमार केला. हे प्रकरण ताजे आहे. मात्र अजूनही बोपखेलचा पेच सुटू शकला नाही. त्यातच, पिंपळे सौदागरच्या ग्रामस्थांनी रस्ता बंद करण्याच्या लष्कराच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे लष्कराने कुंजीर वस्तीतून जाणारा येथील रस्ता तातडीने बंद केला. बोपखेलप्रमाणेच याही ठिकाणी सुरक्षिततेचा मुद्दा निर्णायक ठरला आहे. बोपखेलचा अनुभव लक्षात घेता स्थानिक नागरिकांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मंगळवारी सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या निर्णयामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. ऐन घाईच्या वेळी सहा किलोमीटरचा वळसा पडणार आहे. लष्कराने लवचिक भूमिका घ्यावी, अशी ग्रामस्थांची भावना आहे.
– शत्रुघ्न काटे, नगरसेवक