पुणे महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात वाहतूक नियोजन, नवे उड्डाणपूल तसेच पाणीपुरवठा आदी कामांसाठी मोठय़ा तरतुदी करण्यात आल्या असून अनेक नवे प्रकल्पही प्रस्तावित करण्यात आले आहेत.
पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात अनेकविध कामे प्रस्तावित केली असून या कामांसाठी २५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर येथील हरिभाऊ देसाई चौकात वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव आहे. तसेच चांदणी चौकातील मोठी वाहतूक लक्षात घेऊन तेथे बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. कात्रज चौकातही भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे आणि सूस रस्त्यावरील पुलांचे रुंदीकरणही येत्या वर्षांत करण्याचे नियोजन आहे. हॅरिस पुलालगत आणखी एक पूल बांधण्याचे नियोजन असून मुंढवा येथे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे ओलांडणी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्या बरोबरच शहरातील नदीवर असलेल्या पुलांची देखभाल व दुरुस्ती यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे मेट्रो
पुणे मेट्रो प्रकल्पांर्गत वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड असे दोन मार्ग प्रस्तावित असून मेट्रो प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करणे, सल्लागार नेमणे, कार्यालयाचे भाडे, वरिष्ठ अधिकारी, संचालक, सेवकांवरील वेतनाचा खर्च वगैरे प्राथमिक गोष्टींसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मेट्रोच्या दोन्ही मार्गाची मिळून लांबी ३१ किलोमीटर आहे. त्यातील २६ किलोमीटरचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) तर पाच किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. हा प्रकल्प २०१९-२० मध्ये पूर्ण करण्याच्या नियोजनानुसार त्याचा सुधारित खर्च ११,८०२ कोटी असेल. केंद्र शासनाच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डपुढे मेट्रोचा प्रकल्प मंजुरीसाठी असून त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पुणे मेट्रोला अंतिम मंजुरी मिळेल.
पाणी पुरवठय़ासाठी ५२३ कोटी
पाणीपुरवठय़ासाठी महसुली आणि भांडवली कामांसाठी मिळून ५२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खडकवासला ते पर्वती जलकेंद्र दरम्यान कालव्यातून पाणी आणले जाते. त्याऐवजी कालव्यात जलवाहिनी टाकण्याची योजना आहे. वर्षभरात त्यातील सत्तर टक्के काम पूर्ण होईल. वारजे येथे प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्रही या वर्षांत कार्यान्वित होईल. तसेच वडगाव जलशुद्धीकरण केंद्राचे कामही  येत्या वर्षांत पूर्ण केले जाईल. समान पाणी वाटप योजनेचीही सुरुवात येत्या वर्षांत होणार असल्याचे आयुक्तांनी अंदाजपत्रकात सांगितले आहे.

येत्या वर्षांतील महत्त्वाची कामे

रामवाडी भुयारी मार्गाचे काम पूर्ण होणार
गाडीतळ उड्डाणपूल पूर्ण होणार
अलंकार चित्रपटगृहाजवळ रेल्वे ओलांडणी पूल बांधणार
स्वारगेट येथील उड्डाणपुलासाठी ४८ कोटींची तरतूद
अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील उड्डाणपूल पूर्ण होणार
चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपूल
कात्रज चौकात भुयारी मार्ग, उड्डाणपूल