कोरेगाव भीमा या ठिकाणी १ जानेवारी रोजी हिंसाचार उसळला. ज्याचे पडसाद राज्यभरात उमटले. आता याचप्रकरणी मिलिंद एकबोटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात शिवाजी नगर न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. एकबोटे यांना पकडण्यासाठी खास पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.

कोरेगाव भीमा या ठिकाणी १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथील शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील दलित बांधव गेले होते. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच कोरेगाव भीमा परिसर आणि आसपासच्या गावांचे सुमारे ९ कोटींचे नुकसान झाले. या घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. तसेच संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेचीही मागणी केली होती. दलित बांधवांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तरीही या दोन्ही आरोपींनी पकडण्यात चालढकल आणि दिरंगाई होत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता.

आता मिलिंद एकबोटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोरेगाव  भीमा दंगलप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे.

१ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील  कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. तसेच येथे जमलेल्या लोकांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. दगडफेकीस प्रवृत्त करणे आणि लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.