भोसरी येथील खुनाच्या गुन्ह्य़ात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून पळून गेलेल्या गुन्हेगाराला दोन वर्षांनंतर दरोडा प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याच्या सोबत पळून गेलेल्या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
विजय मारुती ढमढेरे (वय २५, रा. खंडोबामाळ, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी भोसरीगाव येथील यात्रेत मारामारी सोडविण्यास गेल्याच्या प्रकरणात विजय ढमढेरे, त्याचे साथीदार प्रतीक डोळस, मिथिलेश कांबळे, राजू सोनवणे, सचिन डोळस यांनी हर्षल तिखे या तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केला होता. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर सत्र न्यायालयात खटला सुरू होता. दरम्यानच्या काळात आरोपी जामिनावर सुटले होते. खटल्याची शेवटची सुनावणी होती त्यावेळी सर्व आरोपी न्यायालयात हजर होते. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला बोलावून खुनाच्या गुन्ह्य़ात दोषी असल्याचे सांगितले. त्यानंतर ढमढेरेसह तीन आरोपींनी न्यायालयातून पलायन केले होते. मात्र, त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली होती आणि ढमढेरे याचा शोध सुरू होता.
दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी बापू जांभळे यांना ढमढेरे हा भोसरी येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे व पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोल्हे यांच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे.