हिंजवडी परिसरात घरात एकट्या असलेल्या महिलांना लुटणाऱ्या चोराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा शोध सीसीटीव्ही फुटेजवरून लावण्यात आला. आशिष मोहन धायगुडे (वय-३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन लाख रुपयांचा सोने व चांदीचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. शिवाय त्याच्यावर पुण्यात देखील विविध गुन्हे दाखल असून यात महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्याचा देखील समावेश आहे. अगोदर परिसरातील टेहाळणी करून घरात एकट्या असलेल्या महिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तो त्यांच्या अंगावरील दागिने लुटत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बावधन परिसरात घरात कोणी नसताना टीव्ही पाहत बसलेल्या महिलेला आरोपी आशिषने लक्ष्य केले होते. महिला दरवाजा लोटून टीव्ही पाहण्यात व्यस्त होती. अचानक आरोपी आशिषने दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला, यामुळे महिला प्रचंड घाबरली. मात्र ती काही बोलायच्या आतच त्याने महिलेचे तोंड दाबून ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर त्या महिलेच्या अंगावरील सोने, चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेत तो फरार झाला होता. या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सापडत नव्हता, दरम्यान, पुन्हा हिंजवडी परिसरातील एका घरात घुसून आरोपी आशिषने एकट्या असलेल्या महिलेवर चाकू हल्ला केला. यात महिलेने प्रतिकार केला आणि दागिने लुटण्याचा डाव हाणून पाडला. तर अन्य एका घटनेतही एकट्या महिलेला पाहून आरोपी आशिषने तिचा विनयभंग केला होता. या सर्व घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडल्या आहेत.

या घटनांनंतर पोलीस आरोपीचा शोध घेत असताना, त्यांना हवा असलेला आरोपी हा बावधन परिसरातील रामनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतिक शेख यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले व संबंधित ठिकाणी अगोदरच सापळा रचून आरोपी आशिषला अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच हिंजवडी परिसरात घडलेल्या गुन्ह्याची त्याने पोलिसांना कबुली दिली. आरोपीवर पुण्याच्या दत्तवाडी आणि खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आरोपीला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी अनरुद्ध गिझे, पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड, वरुडे, वायबसे, बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, अतिक शेख, कुणाल शिंदे, हनुमंत कुंभार, विकी कदम, ओम कांबळे, गुरव, अमर राणे, गुमलाडू, चव्हाण, गडदे, शेख अली, आकाश पांढरे यांनी केली.