पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात करोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. करोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अवघ्या महाराष्ट्रात जिल्हाबंदी लागू करण्यात आली. अगदीच काही महत्वाचं असेल तर नागरिक ई-पास द्वारे रीतसर परवानगी घेऊन इतर जिल्ह्यात जाऊ शकतात. परंतु, याच ई-पास चा चक्क गांजा विक्री करण्यासाठी वापर झाल्याचं उघड झाले आहे. एक व्यक्ती लातूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येत असे अस पोलीस तपासात समोर आले आहे.

संबंधित आरोपीकडून 10 लाख 15 हजारांचा मुद्देमाल यात 20 किलो 595 ग्रॅम गांजा आणि एक चारचाकी मोटार अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केली आहे. अल्लाबक्ष नजीर शेख वय-26 रा. महात्मागांधी रोड लातूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो लातूर येथून चारचाकी मोटारीने पिंपरी-चिंचवड शहर गाठायचा. त्याच्याकडे ई-पास मिळाला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अमली पदार्थ विरोधी पथक यांना आरोपी हा 2-3 वेळेस चिंचवड परिसरात गांजा विक्री करण्यास आल्याचं समजलं होत. मात्र, तेव्हा तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला. परंतु, बुधवारी अल्लाबक्ष याच्यावर पोलीस बारकाईने नजर ठेवून होते. तो लातूर ला होता. हे पोलिसांना माहीत होते. पण, तो चिंचवडमध्ये गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस कर्मचारी शाकिर जेनेडी यांना मिळाली होती. त्यानुसार वाकड, डांगे चौक आणि चिंचवड याठिकाणी पथक सापळा रचून होते. आरोपी येणार ही पक्की खबर असल्याने सर्व जण नजर ठेवून होते. अखेर सकाळी आरोपी अल्लाबक्ष चिंचवड येथे आला त्याला गांजासह पोलिसांनी अटक केली. सदर ची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले, शाकीर जेनेडी, संदीप पाटील दिनेश, भुजबळ, राजेंद्र बांबळे, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, अजित कुटे, शकुर तांबोळी, प्रसाद कलाटे, दादा धस, शैलेश मगर संतोष भालेराव यांच्या पथकाने केली आहे.

…..अन पोलीस 10 तास सापळा रचून थांबले होते

आरोपी अल्लाबक्ष हा लातूर येथून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने मध्यरात्री निघाला. त्याच्याकडे मोटारीत 20 किलो 995 ग्रॅम गांजा पाठीमाग च्या सीटाखाली ठेवण्यात आला होता. पोलीस रात्री उशिरा नसणार याची खात्री बाळगून त्याने प्रवास सुरु केला. त्याच्या प्रत्येक हालचालींवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर होती. तो कुठे येणार याची माहिती काढून तीन ठिकाणी पथक सापळा रचून होते. मध्यरात्री पासून सकाळी पर्यंत ही पथके आरोपी ची वाट पाहत होती. अखेर अल्लाबक्ष चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे आला. तो येताच त्याला मोटार आणि गांजासह अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांची तिन्ही पथक हे 10 तास ताटकळत सापळा लागून थांबली होती अस पोलीस सूत्रांनी सांगितले.

ई- पास चा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही!

आरोपी अल्लाबक्ष हा ई- पास घेऊन लातूर येथून पिंपरी-चिंचवड शहरात गांजा विक्रीसाठी आला होता. अल्लाबक्ष पकडला गेल्याने हा प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला. असे, अनेक प्रकार होत असणार यात काही शंका नाही. यावर पोलीस आणि संबंधित यंत्रणेने जरब बसवणे गरजेचे आहे. खात्री करून च पास देणे गरजेचे आहे. हे या घटनेवरून अधोरिखीत होत आहे.