साहित्य हा मानवी जीवनाला आकार देणारा कलाप्रकार असल्याने या कलेची कास प्रत्येकाने धरायला हवी, असे मत संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री आणि नाटय़संमेलनाध्यक्षा फैय्याज यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे आयोजित ‘संमेलनपूर्व संमेलना’मध्ये सुरेश साखवळकर आणि डॉ. अनंत परांजपे यांनी फैय्याज यांची मुलाखत घेतली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची तळेगाव दाभाडे शाखा, नाटय़ परिषदेची शाखा आणि कलापिनी या तीन संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि संमेलनाचे स्वयंसेवक सचिन इटकर या वेळी उपस्थित होते.
साहित्य संमेलन हा मराठी परंपरेचा एक अविभाज्य भाग असून त्यातून साहित्य आणि कलेचा प्रचार होत असतो. अशा संमेलनातून साहित्यिक आणि नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध होत असते, असे फैय्याज यांनी सांगितले. बेगम अख्तर यांच्याकडे शिकलेल्या दादरा आणि ठुमऱ्यांसह ‘स्वयंवर’ नाटकातील ‘मम आत्म गमला’, ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकातील ‘लागी कलेजवा कटार’ आणि ‘गोरा कुंभार’ नाटकातील ‘निर्गुणाचा संग धरिला जो आवडी’ ही नाटय़पदे त्यांनी सादर केली. दादा कोंडके यांच्यासमवेत ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ातील प्रयोगाच्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला.
देखणे आणि सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील साहित्य रसिकांना संमेलनास उपस्थित राहण्यासाठी आयोजकांतर्फे बस गाडय़ा ठेवण्यात येणार असल्याचे सचिन इटकर यांनी सांगितले.