श्रीराम ओक

एका अपरिचित स्पर्शाच्या विश्वात, त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या दूर करीत त्यांचे जीवन आनंददायी करता येईल, या विश्वासाने अलका पारखी यांनी प्रवेश केला. हा प्रवेश त्यांच्यासाठी अनुभवसंपन्नता देणारा तर आहेच, पण त्याबरोबरच पारखी यांचा जादुई स्पर्श अनेकांना आपली ‘माय’ देणारा आहे.

सामाजिक कार्यक्षेत्रातील व्यक्तीं आंतरबाह्य़ बदलून जाते. कर्तव्य, गरज किंवा स्वत:च्या सोयीसाठी कोणत्याही आर्थिक व्यवहाराची अपेक्षा न ठेवताही केलेले सामाजिक कार्य त्या कार्यकर्त्यांला, त्याच्या आयुष्याला एखाद्या उंचीवर घेऊन जाते. समाजातील विविध वृत्तींचा आणि विचारांचा सन्मान राखत अलका दीपक पारखी यांनी एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश केला. या जगात प्रवेश करण्यापूर्वी असेही जग असते, ही कल्पना त्यांच्यासाठी तशी काहीशी नवीनच होती. पण वेगळ्या भावविश्वात त्यांनी पाऊल टाकले आणि अनेकांवर मायेची पखरण करीत त्यांचा तेवढय़ाच खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने प्रवास सुरू आहे, आज दोन तपांनंतरही.

विविध वयोगटातील मतिमंद मुलामुलांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘सावली पालक संघ’ या संस्थेत प्रवेश करताना ते भावविश्व पारखी यांना पूर्णपणे अपिरिचित होते. असे असतानाही पारखी यांनी त्यांच्यासाठी कार्य करायचे ठरवले. काम सुरू केल्यानंतर केवळ सासुबाईंना अलका यांनी कल्पना दिली होती, पण पहिले आठ दिवस, पती आणि मुले मात्र त्यांच्या कार्याबाबत अनभिज्ञच होती. मुले शाळेत गेल्यानंतर काय करायचे या विचारांनी त्यांनी या मतिमंद मुलांच्या संस्थेत काम करण्यासाठी वसंत ठकार यांची सहज म्हणून भेट घेतली आणि आज ‘सावली’च्या कुटुंबसदस्य झाल्या आहेत. अनेक मतिमंद मुलांसाठी सावलीप्रमाणे कार्यरत असणाऱ्या या संस्थेने येथे राहणाऱ्या मुलांशिवायही अनेक पालकांना, संस्थांना दिलासा देण्याबरोबरच मार्गदर्शक, सहायक अशा भूमिका बजावल्या आहेत. सावली येथील मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी संवाद साधण्याचे, त्यांचे समुपदेशन करण्याचे कौशल्य अलका यांना प्राप्त आहे, त्यासाठी त्यांनी समुपदेशाचे पुण्यात आणि पुण्याबाहेरही प्रशिक्षण घेतले आहे. या सगळ्या कार्यात अलका यांनी अनेक मतिमंद मुलांची, त्यांच्या पालकांची अगतिकता ओळखून त्यांना समस्येची जाणीव करून देत असतानाच त्या कुटुंबाचे जगणे सुसह्य़ व्हावे म्हणून विविधांगी प्रयत्न सुरू केले. वसतिगृहातील सोईसुविधा पाहण्यापासून मुलांना मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा तपासेपर्यंत अनेक भूमिका अलका यांनी पार पाडल्या आहेत. अलका यांना त्यांच्या कार्यात ठकार कुटुंबीयांनी सामावून घेण्यापासून विश्वास टाकण्यापर्यंत आणि आत्मविश्वास निर्माण करेपर्यंत जशी साथ दिली तशीच साथ पारखी कुटुंबीयांनी देखील दिली. आपण कोणासाठी आणि काय काम करतो हे अलका यांनी त्यांच्या सासुबाईंना संस्थेत नेऊन दाखवले होते. आपल्याशिवाय घरात अडणार नाही याची काळजी जशी अलका यांनी घेतली, तसेच त्यांच्या सासुबाईंनी देखील त्यांच्या कार्यात कधीच आडकाठी न आणता केवळ मदत आणि मदतच केली. अलका यांचे पती दीपक आणि मुले ओजस, गंधार यांचा केवळ पाठिंबाच नाही तर प्रत्यक्ष सहभाग देखील आजपर्यंत ‘सावली’च्या कार्यात असतो. तेथील मुलांबरोबरच्या सहलीमध्ये कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून दीपक जसे जातात, तसेच मुले संस्थेतील मुलांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून जातात. अशा रीतीने पारखी कुटुंबीय सामाजिक कार्यात रंगलेले दिसते. जाहिरात क्षेत्रात रमलेला ओजस आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेला गंधार दोघेही आपापल्या क्षेत्रात व्यस्त असूनही त्यांनी सामाजिक कार्याबरोबर आपली नाळ तुटू दिली नाही, हे विशेष.

मतिमंद मुलांना देखील स्वत:च्या भावभावना, जाणिवा असतात. केवळ हाडामासांचा गोळा नाही तर माणसाच्या जन्माला आलेल्या या मुलांना पालकांनी, समाजाने जर झिडकारले तर ती जाणार तरी कुठे? यातही ज्या मुलांना आईबापच नाहीत किंवा ते वृद्ध झालेले आहेत, तर या मतिमंद मुलांनी जगायचे तरी कोणाच्या आधाराने. त्यांचा आधार होण्याचे कार्य ठकार यांच्या सावली संस्थेने स्वीकारले. ठकार यांच्या मुलीला कोणत्याच मतिमंदांच्या संस्थेत प्रवेश मिळत नव्हता, तेव्हा वसंत आणि कै. प्रभावती ठकार यांनी या संस्थेची उभारणी केली. त्यांच्या कार्याला समाजातील अनेक घटक हस्ते परहस्ते मदत करीत असतात, त्यातील खारीचा वाटा श्रमदानाच्या माध्यमातून उचलण्याची संधी आपल्याला मिळाल्याची अलका पारखी यांची भावना. या मुलांच्या समस्या जाणून घ्यायची असतील, सावली संस्था पाहायची असेल, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करायची असेल, तर ९९२२७५८९१३ या क्रमांकावर पारखी यांच्याशी संपर्क साधता येईल.

या मुलांना काय हवे-नको हे जेव्हा कळत नाही, तेव्हा येणारी अस्वस्थता भयाण असते आणि त्या वेळी आपल्या बौद्धिक, शारीरिक, मानसिकशक्तींचे एकत्रीकरण करून त्या मुलांची काळजी घ्यावी लागते. या मुलांच्या कोणत्याही प्रकारच्या भावनांचा उद्रेक झाला, तरी आपण स्वत:ला सर्व पातळ्यांवर शांत ठेवत, त्या मुलांना त्यांच्या त्या वेळेच्या आतताई भावनांपासून मुक्त करावे लागते. अशा कसोटीच्या क्षणांमध्ये मुलांना असुरक्षितेच्या जाणिवेपासून देखील दूर ठेवावे लागते, या सगळ्या कसोटय़ा संयमाने हाताळत मतिमंद मुलांसाठी ‘सावली’ वटवृक्षाप्रमाणे असून अलका पारखी यांच्यासारखे अनेक जण, तेथील कार्यकर्ते, शिक्षक या त्याच्या शाखा आहेत, असेच म्हणावे लागेल.

shriram.oak@expressindia.com