22 July 2019

News Flash

प्रेरणा : सेवाव्रती

समाज म्हटले की विचारप्रणालीबरोबरच आर्थिक निकषांमधील भेदाभेद देखील क्रमप्राप्तच आहेत.

हरिॐकाका

श्रीराम ओक

समाज म्हटले की विचारप्रणालीबरोबरच आर्थिक निकषांमधील भेदाभेद देखील क्रमप्राप्तच आहेत. या निकषांबरोबर प्रवास करताना स्वत:चा तोल सांभाळताना माणूस दमून जातो. या प्रवासात प्रत्येकालाच तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे जो तो आपण आणि आपले कुटुंब इतकाच विचार करीत असतो. पण कुटुंबापेक्षाही प्रसंगी समाजासाठी कार्यरत असणारी काही व्यक्तिमत्त्वे असतात, त्यापैकीच एक सदाशिव अच्युत मालशे तथा हरिॐकाका.

वैविध्यपूर्ण आनंदोत्सव साजरे करणारा मनुष्यप्राणी प्रसंगी संकटांचा सामना करीत आपापली लढाई लढतच असतो. विविध प्रकारच्या उद्यमशीलतेमध्ये समाजात राहूनही त्याची समाजाशी असणारी नाळ मात्र तुटलेली असते. अर्थातच याला अपवाद असतात. समाजातील दु:खितांच्या दु:खावर फुंकर घालीत, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे आणि इतकेच नाही तर त्यांच्या पोटापाण्याची, निवाऱ्याची सुयोग्य व्यवस्था व्हावी म्हणून झटणारेही असतातचकी. पण यापैकी अनेकांची प्रसारमाध्यमातून, समाजमाध्यमातून प्रकाशझोतात येण्यासाठी धडपड सुरू असते. पण याला असणाऱ्या अपवादांपैकी एक अपवाद म्हणजे हरिॐकाका. याच नावाने सुपरिचित असणाऱ्या काकांनी कोणताही गाजावाजा न करता केवळ माणुसकीच्या नात्याने या कार्यात स्वत:ला झोकून दिले.

स्वच्छ चारित्र्य, सचोटी, लोकसंग्रह वाढविण्याच्या गुणांबरोबरच शिस्तप्रियता, नि:स्वार्थ भाव, समोरच्याच्याप्रती असणारा आदरभाव, विन्रमता अशा विविध गुणांनी युक्त असणारे हरिॐकाका आज अनेक सामाजिक संस्थांसाठी सेतू म्हणून कार्यरत आहेत. संस्थांच्या दैनंदिन गरजांमध्ये लागणाऱ्या वस्तूबरोबरच तेथील मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास तसेच आरोग्यारक्षणासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी ते सतत झटत असतात. या शिवाय त्या संस्थांमध्ये अत्यल्प शुल्क मिळविणाऱ्या शिक्षकांच्या आर्थिक विवंचना कमी व्हाव्यात म्हणूनदेखील ते झटतात. या कार्यात देगणीदारांना प्रोत्साहित करीत आपली वेगळी कल्पना त्यांना समजावून सांगत त्यांच्या आर्थिक तसेच प्रत्यक्ष सहभागावरही ते भर देतात. कार्यालयांमधून पायदळी जाणाऱ्या तांदळाचा भात शिजवून भुकेल्या जिवांच्या पोटी जावा म्हणून तेवढय़ाच तळमळीने कार्यालय व्यवस्थापनांची मदत घेत आपली कार्यकर्त्यांची भूमिका चोख बजावतात.

देणाऱ्यांच्या हातांना सुयोग्य ठिकाणी पोहोचता यावे, म्हणून आपला वेळ, कल्पना आणि प्रसंगी पैसाही खर्च करणाऱ्या हरिॐकाकांचा घेणाऱ्यांना संतुष्ट करण्याबरोबरच देणाऱ्यांनाही योग्य ठिकाणी दिल्याचे समाधान मिळवून देण्याकडे कल असतो. ही जशी त्यांच्या कार्याची खासियत तसेच देणाऱ्यांच्या देण्याचा सुयोग्य विनियोग होतो आहे की नाही, याच्यासाठीची दक्षता हे त्यांच्या कार्याचे वेगळेपण. अनेकदा देणारे खूप मिळतात आणि देणारे देत आहेत, म्हणून घेणारेही टपून बसलेले असतात. पण देणाऱ्यांना गरजवंत संस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदाशिव या नावाला जागृत ठेवत वेळप्रसंगी ते आपला तृतीय नेत्रही उघडतात आणि सदा दक्षही असतात. अशा या हरिॐकाकांच्या माध्यमातून तुम्हालाही काही संस्थांना मदत करण्याची इच्छा असेल आणि आपली मदत योग्य हातांमध्ये पोहोचली की नाही याची निश्चिंतता हवी असेल तर ९६०४६४४२१२ हा क्रमांक तुमच्या उपयोगी येईल.

बालपणात घडलेले संस्कार, घेतलेले अनुभव प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करतात. हरिॐकाकांच्याही बाबतीत काहीसे असेच घडले. चिपळूण तालुक्यातील गांग्रई या खेडय़ात जन्मलेले सदाशिव मालशे पितृछत्र हरवल्यामुळे लहानपणीच पुण्यात मामांच्या आश्रयाला आले. मामांच्या मदतीने पुण्यात राहणे तर झाले पण शिक्षणासाठी, दैनंदिन गरजा, पोटाची भूक भागविण्यासाठी सतत इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागले. या काळात वर्तमानपत्र टाकणे, दूध घालणे, भाजी विकणे अशी विविध कामे करीत अनाथ विद्यार्थी गृहातून आपले शिक्षण पूर्ण केले. वार लावून उदरनिर्वाह करण्याबरोबरच विविध कष्टदायी कार्य कराव्या लागलेल्या मालशे यांनी आपल्याला झालेल्या कष्टाची जाणीव ठेवली. आपल्याला जे कष्ट भोगावे लागले त्या कष्टापासून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी म्हणून विविध सामाजिक संस्थांद्वारे ते अनेक विद्यार्थ्यांना मदत करीत आहेत. केवळ सामाजिक संस्थांच नाही, तर काही मुले शैक्षणिकदृष्टय़ा दत्तक घेण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला सुयोग्य दिशा मिळावी म्हणून मालशे यांची धडपड सुरू असते.

स्वत:च्या खिशातून मदत करण्याबरोबरच देगणी देणाऱ्यांना सुयोग्य संस्थेबाबत मार्गदर्शन करणे, पुढाकार घेऊन देणगीदारांना संस्था भेट घडविणे आदी कार्य करीत पारदर्शकता ठेवत विविध संस्थांना ते मागील पन्नास वर्ष मदत करीत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देता यावे, त्यांना योग्य निवारा, पोटाला अन्न मिळावे म्हणून ज्या सामाजिक संस्था या मुलांचा सांभाळ करतात, त्या संस्थांसाठी आणि पर्यायाने त्या मुलांसाठी आधारस्तंभ झालेल्या मालशे यांना खुर्चीचा, पदाचा मोह नाही.  सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना पत्नीची मोलाची साथ त्यांना मिळाली असली तरी पत्नीच्या अंतिम दिवसांमध्ये आणि इतर वेळीदेखील त्यांनी घराकडे दुर्लक्ष मात्र कधीच केले नाही. दोन मुलींचे जीवन संस्कारक्षम करण्याबरोबरच त्यांचे विवाहदेखील  सुयोग्य पद्धतीने, आर्थिक नियोजन करीत कोणत्याही दडपणाशिवाय त्यांनी हे विवाह पार पाडले. पुणे महापालिकेत आरोग्य निरीक्षकाच्या पदावरून निवृत्त झालेल्या हरिॐकाकांनी नोकरीतही आपल्या सामाजिक कार्याला कधी दूर केले नाही. गरजूंना दुबळे करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पायावर सक्षपणे

उभे राहता यावे म्हणून प्रयत्न करणारे हरिॐकाका केवळ सकाळचे काही तासच नाही, तर वेळप्रसंगीही निवारा वृद्धाश्रमात हजर राहतात आणि आपली सेवा बजावतात.

हरिॐकाकांनी आज वयाच्या पंचाहत्तरीपूर्तीच्या टप्प्यावरही आपले सेवाकार्य पूर्वीपेक्षाही अधिक कार्यक्षमतेने सुरू ठेवले आहे. हे कार्य करीत असताना संस्थांकडून देगणीदारांना पावती पोहोचते का नाही ? याकडे जसे काकांचे लक्ष असते, तसेच ज्या लाभार्थीसाठी देगणीदाराने पैसे दिले आहेत, त्यांच्यासाठीच त्या पैशांचा विनियोग होतोय की नाही, याकडेदेखील कटाक्षाने हरिॐकाका लक्ष ठेवतात.

First Published on December 7, 2018 12:51 am

Web Title: article about hari om kaka