News Flash

अपघातामुळे समाजकार्याला दिशा मिळाली

नुकताच साजरा झालेला मैत्रीदिन जगभर पोहोचवण्यात देखील समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बुलेट रायडिंग करत नव्या नव्या ठिकाणांना भेटी देणे अनेकांना आवडते. तसे ग्रुप शहरांमध्ये असतातही. बुलेटवरुन गावे, शहरे पालथी घालताना येणारे अनुभव अनेकदा नवे काही करायला प्रवृत्तही करतात. अशीच काहीशी घटना रॉयल बुलेटिअर्स पुणे मधील मित्रांच्या बाबतीत घडली आणि त्यातून रायडिंगच्या छंदाला नवी दिशा मिळाली.

समाजमाध्यमे आता फक्त लाईक, शेअर, पोस्ट एवढय़ापुरतीच मर्यादित न राहता अनेक विधायक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत. नुकताच साजरा झालेला मैत्रीदिन जगभर पोहोचवण्यात देखील समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. या मैत्रीदिनाच्या निमित्ताने आपल्या मित्राच्या अपघाताच्या घटनेचे स्मरण ठेवून तसा प्रसंग इतर कोणावरही येऊ नये या हेतूने पुण्यातील ‘रॉयल बुलेटिअर्स’ ग्रुपच्या तरूणांनी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाविषयी जाणून घेणार आहोत.

‘रॉयल बुलेटिअर्स पुणे’चे सर्व सदस्य ग्रुपच्या नावाप्रमाणेच बुलेटप्रेमी. सर्व सदस्य आपला व्यवसाय, नोकरी सांभाळत रायडिंगसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. त्यामुळे फक्त राज्यातीलच नव्हे, तर राज्याबाहेरीलदेखील अनेक मित्र त्यांनी जोडले आहेत. ग्रुपमध्ये समाजमाध्यमांद्वारे जोडलेला कर्नाटकातील मित्र शिवकुमार पााटील आणि काही जण साताऱ्यातील अजिंक्यतारा परिसरात रायडिंगसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांचा मित्र शिवकुमार पाटील याचा लोणंद फलटण रस्त्यावरील  तीव्र उतारामुळे  मुळीक गावाजवळ अपघात झाला. अपघातग्रस्त मित्र उपचारांमुळे वाचला, परंतु आपल्या मित्रावर ओढवलेला प्रसंग इतर कोणावरही ओढवू नये या उद्देशाने सर्व बुलेटप्रेमींनी त्या गावाला भेट दिली. मित्राचा अपघात ज्या ठिकाणी झाला तेथे धोकादायक वळण असून तेथे सर्रास अपघात होतात आणि यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावल्याची माहिती तेथील स्थानिकांकडून मिळाली. खराब रस्ते, रस्त्यावर दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे अपघात होतात ही सर्व परिस्थिती पाहून गप्प बसणार ते कसले बुलेट रायडर्स!  ग्रुपच्या सर्व सदस्यांनी जमेल तेवढी वर्गणी काढली. जमलेल्या रकमेतून अपघातग्रस्त मित्राच्या उपचारासाठी काही रक्कम दिली आणि उरलेल्या रकमेतून मित्राचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या रस्त्यावर तेथील स्थानिकांच्या मदतीने रायडर्सनी खड्डे बुजवले, वळणावर दिशादर्शक फलक बसविले.

ग्रुपचे सदस्य गजानन सरकाळे म्हणाले,की या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यात समाजमाध्यमांचा मोठा हातभार आहे. समाजमाध्यमांमुळे अनेक ठिकाणांहून लोकांचे फोन आले. उपक्रमाचे कौतुक झाले. उपक्रमाविषयी कोणतीही जाहिरात केली नाही. फक्त समाजमाध्यमांमुळे ही माहिती लोकांपर्यंत पोचली व अनेकांनी मदतीसाठी विचारणा केली. ग्रुपचे फेसबुक पेज, यूटय़ुब चॅनेल, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून सर्व उपक्रमांची माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते.

ग्रुपतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम देखील राबविले जातात. यामध्ये विविध सामाजिक संस्थांना भेट देणे, दुर्गम भागातील शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करणे या सारखे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांबरोबरच अंध शाळेतील विद्यार्थ्यांना वाद्यं उपलब्ध करून दिली गेली, ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. हा ग्रुप फिरण्याची आणि समाजकार्याची आवड असणाऱ्या सर्वासाठी खुला आहे. फक्त ग्रुपच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग गरजेचा असल्याचे सरकाळे यांनी सांगितले. ग्रुपच्या अधिक माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी ९९२२९३३८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. ग्रुपचे फेसबुक पेज आणि यूटय़ूब चॅनेल ‘रॉयल बुलेटिअर्स पुणे’ या नावाने आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2018 1:27 am

Web Title: article about helping for society
Next Stories
1 नवे गडी, नवे राज्य!
2 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात गुरूवारी ठिय्या आंदोलन
3 ‘औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर नियंत्रणासाठी देशांतर्गत स्वतंत्र पोर्टल हवे’
Just Now!
X