15 January 2021

News Flash

नवोन्मेष : इन्फिनिटी एंटरप्रायजेस

सुमीत वाल्हेकर यांनी इन्फिनिटी एंटरप्रायजेस प्रायव्हेट लि. या फर्मची स्थापना दोन वर्षांपूर्वी केली.

(संग्रहित छायाचित्र)

प्रथमेश गोडबोले

चार तरुण अभियंत्यांनी एकत्र येत दुचाकी-चारचाकी वॉश, कोटिंग, डेण्टिंग-पेण्टिंग अशा प्रकारची सेवा देणाऱ्या इन्फिनिटी फर्मची स्थापना केली आहे. तसेच या क्षेत्रातील एका कंपनीची फ्रॅन्चायजीदेखील त्यांनी मिळवली आहे. व्यवसाय सुरू करण्याआधी चौघांनी स्वत: व्यावसायिक प्रशिक्षण घेतले असून त्यांनी या क्षेत्रात काम करून व्यवसाय उभा केला आहे. फर्मकडून आतापर्यंत पुण्यातील विविध भागांमध्ये सेवा देण्यात आली असून पिंपरी चिंचवडसह उर्वरित जिल्ह्य़ात आगामी काळात सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.

सुमीत वाल्हेकर यांनी इन्फिनिटी एंटरप्रायजेस प्रायव्हेट लि. या फर्मची स्थापना दोन वर्षांपूर्वी केली. सन २०१४ मध्ये सुमीत यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर तीन वर्षे खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली. व्यवसाय करायचे त्यांनी आधीपासूनच ठरवले होते. व्यवसाय करू पाहणाऱ्या मित्रांबरोबर चर्चा करताना दुचाकी, चारचाकी वॉश, कोटिंग हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना पुढे आली. त्यानंतर वाल्हेकर यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला आणि हाच व्यवसाय करायचे निश्चित केले. सुमीत वाल्हेकर यांच्यासह अभिषेक कांबळे, राज मते आणि विवेक कोडितकर अशा चौघांनी मिळून फर्मची स्थापना केली.

व्यवसाय सुरू केल्यानंतर काही अडचणी आल्या. कारण दुचाकी-चारचाकी वॉश, कोटिंग अशा प्रकारची सेवा देणारा स्वतंत्र व्यवसाय फारसा प्रचलित नसल्याने सुरूवातीच्या काळात ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मोठे उद्दिष्ट होते. अधिकाधिक ग्राहकांना नेमका व्यवसाय काय आहे, फर्मच्या कोणत्या आणि कशा प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत, हे सांगणे हा उद्देश समोर ठेवून चौघांनी कामाला प्रारंभ केला. त्याकरिता विपणनावर अधिकाधिक भर दिला. फर्मचे फेसबुक पेज असून समाजमाध्यमे, जाहिरात फलक अशा स्वरुपात सुरूवातीच्या काळात फर्मची जाहिरात करण्यात आली. नांदेडसिटी, डीएसके विश्व आणि परिसरात दोन-तीन दिवसांचे विपणनाचे विशेष कार्यक्रमही त्यांनी आयोजित केले. त्यानंतर हळूहळू मागणी येऊ लागली.

‘इन्फिनिटी एंटरप्रायझेस ही फर्म आहे. तर, ऑटो हर्बची फ्रॅन्चायजी देखील आम्ही घेतली आहे. ऑटो हर्बकडून उत्पादने घेऊन इन्फिनिटी एंटरप्रायझेसकडून विविध सेवा दिल्या जातात. नांदेड सिटी भागात फर्मचा नऊ हजार चौरस फुटांचा कारखाना आहे. माझ्यासह इतर भागीदारांनी व्यवसाय सुरू करण्याआधी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे फर्मकडून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा उत्कृष्ट असून एकदा ग्राहक फर्मशी जोडला गेल्यानंतर तो फर्मचाच भाग होतो. नवीन कामगार फर्ममध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते’, असेही सुमीत सांगतात.

फर्मकडून कार वॉश, कार क्लिनिंग, पेण्ट प्रोटेक्शन, नॅनो सिरॅमिक कोटिंग, हेडलाइट रिस्टोअरेशन, फ्रण्ट ग्लास ट्रिटमेंट, अ‍ॅण्टी-रश कोटिंग, बाइक कोटिंग अशा विविध सेवा दिल्या जातात. कार वॉशमध्ये फोम वॉश, प्लॅटिनम वॉश, स्टीम वॉश अशा सेवा आहेत. कार क्लिनिंगमध्ये फुल स्पा, ओझोन ट्रिटमेंट, एसी वेण्ट क्लि निंग, पेण्ट प्रोटेक्शनमध्ये कार रबिंग अ‍ॅण्ड पॉलिशिंग, कार पोलिमेर आणि सिंथेटिक कोटिंग, तर बाइक कोटिंगअंतर्गत बाइक सिंथेटिक आणि सिरॅमिक कोटिंग अशा सेवा दिल्या जातात. याबरोबरच गेल्या चार महिन्यांपासून दुचाकींचे डेंटिंग-पेण्टिंग सेंटर सुरू केले आहे. फर्मकडून आतापर्यंत दौंड, कात्रज, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे, नांदेडसिटी, खडकवासला, डीएसके विश्व अशा विविध भागात सेवा दिल्या आहेत. फर्मची माहिती जस्ट डायलवर असल्याने जिल्ह्य़ातील विविध भागातील ग्राहकही फर्मशी जोडले गेले आहेत.

सुमीत आणि इतर तीनही भागीदार लहानपणापासून मित्र असून चौघेही अभियांत्रिकीमधील विविध शाखांचे अभियंता आहेत. सुमीत फर्मचे काम आणि व्यवसायवृद्धीचे काम पाहतात. अभिषेक यांच्याकडे फर्मकडून दिल्या जाणाऱ्या सेवेची गुणवत्ता पाहण्याचे काम आहे. राज मते कार अ‍ॅक्सेसरीज आणि डेंटिंग-पेण्टिंगचे काम पाहतात आणि विवेक कोडीतकर व्यवसायाचे इतर कामकाज पाहतात. निवडलेल्या क्षेत्रात स्वत: काम करून या चौघांनी व्यवसाय उभा केला आहे.

‘नांदेड सिटी येथे कारखाना असल्याने या आणि आजूबाजूच्या भागातील ग्राहक आमच्याशी जोडले गेले आहेत. आगामी काळात संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्य़ातील ग्राहकांपर्यंत सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अन्य भागातील चारचाकी वाहनधारकांना सहजरीत्या सेवा देण्यासाठी पिक अ‍ॅण्ड ड्रॉप सेवा देण्याचा मानस आहे’, असेही सुमीत सांगतात.

prathamesh.godbole@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:02 am

Web Title: article about infinity enterprises
Next Stories
1 प्रेरणा : हृदय ‘स्पर्शी’
2 गणेश मंडळांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घाला : अजित पवार
3 विश्वासघात! लिव्ह इन पार्टनरने पॉर्न साईटवर अपलोड केला विवाहित महिलेचा व्हिडिओ
Just Now!
X