वाढदिवसाच्या शुभेच्छा, अभिनंदन, जाहिरात करणारे अनेक फ्लेक्स आपण रस्त्यावर सर्रास पाहतो. या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होते अशी ओरड होत असते. परंतु हेच वापरलेल्या, निरुपयोगी फ्लेक्सचा उपयोग करत गरजू लोकांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी मॅजिक कव्हर बनवून देत ‘ह्य़ु-मॅन इंडिया का अपना सुपरहिरो’च्या तरुणांनी वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. बेघर लोकांना थंडीपासून संरक्षण देणाऱ्या मॅजिक कव्हर बनविणाऱ्या तरुणांविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजमाध्यमे फक्त लाईक, शेअर, पोस्ट एवढय़ावरच राहिलेली नाहीत. अनेक विधायक उपक्रम राबवून युवकांनी समाजासमोर आदर्श निर्माण केले आहेत. याची आपण आजपर्यंत अनेक उदाहरणे पाहिली आहेत. शहरामध्ये पदपथावर, सिग्नलजवळ, नदीपात्रात अनेक व्यक्ती आपले जीवन जगत असतात. आजारी पडल्यानंतर थंडीमुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही आपण ऐकल्या आहेत. या बेघर व्यक्तींकडे थंडी पावसापासून संरक्षण करण्यासाठी  काही महाविद्यालयीन तरूण एकत्र आले असून समाजमाध्यमांवर मदतीचे आवाहन करत एक चळवळ उभी केली आहे.

वापरलेले जुने कपडे आपण सर्रास फेकून देतो किंवा जाळून टाकतो. या कपडय़ांचा वापर करून किमान एका व्यक्तीचे थंडीपासून संरक्षण होऊ शकते अशी कल्पना अक्षय शिंदे व त्याच्या मित्रांना आली.  एका संकेतस्थळाच्या मॅजिक बॅग या संकेल्पनेतून ‘मॅजिक कव्हर’ ही संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. याविषयी सांगताना अक्षय म्हणाला, सुरुवातीपासून आम्ही समाजोपयोगी उपक्रम राबवित होतो. एका संकेतस्थळाच्या मॅजिक बॅग या संकल्पनेवरून आम्हाला मॅजिक कव्हर ही कल्पना सुचली. या मॅजिक कव्हरसाठी वापरलेले जुने कपडे एकत्र केले जात आहेत. सर्व एकत्र झालेल्या कपडय़ांतून वापरण्यायोग्य आणि कव्हरसाठी ऊबदार असे वेगळे करून त्याचे वर्गीकरण केले जाते. जुन्या व फाटक्या कपडय़ांपासून ऊबदार अशी गोधडी तयार केली जाणार आहे. ही गोधडी थंडीपासून संरक्षण देईल परंतु पावसापासून या गोधडीचे संरक्षण होण्यासाठी शहरातील वापरलेले, जुने फ्लेक्स गोधडीला वरून अस्तर म्हणून लावण्यात येणार आहे. या फ्लेक्सची पांढरी बाजू वरती असून त्याला चेन बसवण्यात येणार आहे. थंडी आणि पावसापासून संरक्षण देते म्हणून या गोधडीला मॅजिक कव्हर असे म्हटले आहे. मॅजिक कव्हरची वरील बाजू पांढरी असून त्यावर विविध विषयांवर प्रबोधन करणारे सामाजिक संदेश छापले जाणार आहेत.

आमच्या गटात सध्या २० ते २५ विद्यार्थी असून काही शिक्षण घेतात तर काही नोकरी करतात. सध्या या मॅजिक कव्हरसाठी कपडे गोळा करण्याचे काम सुरू असून ४०० ते ५०० किलो जुने कपडे गोळा झाले आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये समाज माध्यमांचा मोठा हातभार लागला आहे. गटातील सर्व सदस्यांकडून व्हॉटसअ‍ॅप वर जुन्या कपडय़ांसाठी आवाहन करण्यात आले आहे. या विधायक कामासाठी ‘ह्य़ु-मॅन इंडिया का अपना सुपरहिरो’ असा गट सुरू करण्यात आला आहे. मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांकडून त्या त्या परिसरात जाऊन सदस्य कपडे घेऊन येतात. उपक्रमाविषयी ऐकल्यानंतर नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ५०० गरजू व्यक्तींना हे कव्हर देणार आहोत. सध्या गटाचे काम हे फक्त व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु येत्या काळात फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात काम करण्यात येणार आहे. मॅजिक कव्हर निर्मिती करण्याकरिता ऊबदार कपडे देण्यासाठी नागरिकांना ८७९६३६६९२९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन अक्षय शिंदे याने केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about magic cover movement in pune
First published on: 12-09-2018 at 04:10 IST