28 September 2020

News Flash

शहरबात : बेभरवशाची पीएमपी

पीएमपी ही आपल्या शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा आहे, ही भावनाच अधिकाऱ्यांमध्ये नाही.

(संग्रहित छायाचित्र)

अविनाश कवठेकर

वारजे येथील बाह्य़वळण मार्गावर पीएमपीच्या गाडीने पेट घेतल्याच्या घटनेमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि पीएमपीचा बेभरवशी कारभार हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्वस्त, सुरक्षित, स्वच्छ, सक्षम आणि भरावशाची सेवा प्रवाशांना देणे दूरच राहिले आहे. एखादी दुर्घटना घडल्याशिवाय काहीच करायचे नाही, ही मानसिकता पीएमपीच्या अधिकाऱ्यांमध्ये दिसत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सुमारे दहा लाख प्रवाशांसाठी प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीची रडकथा सुधारण्याची काही चिन्हे नाहीत. कधी रस्त्यावर बंद पडणाऱ्या गाडय़ा, कधी चालक-वाहकांचे प्रवाशांबरोबरचे उद्धट आणि उर्मट वर्तन, सुटे भाग साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, केवळ खरेदी डोळ्यासमोर ठेवून होत असलेली भरमसाठ उधळपट्टी, गाडय़ांच्या खरेदीचे वाद यात आता गाडय़ांनी रस्त्यावरच पेट घेण्याच्या घटनांची भर पडली आहे.

प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिवहन सेवांचे विलीनीकरण करण्यात आले. प्रवासी केंद्रित सेवा त्यामुळे मिळेल, असा दावा करण्यात आला, पण पीएमपी नावाची नवीन कंपनी स्थापन होऊनही कारभारात तसूभरही फरक पडलेला नाही. पीएमपी ही आपल्या शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा आहे, ही भावनाच अधिकाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे विलीनीकरणाच्या कित्येक वर्षांनंतरही सेवेचा दर्जा निकृष्ट राहिला आहे. पण पीएमपीच्या अधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही. टीका झाली किंवा एखादी दुर्घटना घडली, की समिती स्थापन करण्याचे, अहवाल मागविण्याचे सोपास्कार केले जातात. एक-दोन बैठकाहीही होतात. नंतर पुन्हा तोच प्रकार सुरू होतो.

वारजे येथे पीएमपीच्या गाडीने पेट घेतल्यानंतर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याची जाणीव प्रशासनाला झाली. लगेच बैठक घेऊन समिती स्थापन करण्याची तत्परता दाखविण्यात आली. पीएमपीच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या दृष्टीने कसल्याही सुविधा नाहीत. आगार किंवा गाडय़ांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नाही, ही बाब प्रवाशांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. पण अधिकाऱ्यांना केवळ देखावाच करायचा आहे, असे दिसते. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितताही वाऱ्यावर आहे. वारजे येथील आगीच्या घटनेनंतर समिती स्थापन करण्यात आली. पण या समितीची फलनिष्पित्ती काय, त्यातून काय साध्य होणार आणि काय साध्य झाले, याची माहिती कधीच पुढे येणार नाही.

गाडय़ा बंद पडण्याच्या किंवा अन्य कोणत्याही घटना घडल्या, तरी त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, ही खेदाची बाब आहे. उलट देखभाल दुरुस्तीचे कारण पुढे करून निधी वाढवून घेतला जातो आणि देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे सुरू आहे, असे भासवून हा विषय संपवला जातो. गाडीला आग लागण्याची घटना एखाददुसरी असती, तर तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारण सांगणे योग्य ठरले असते. मात्र गेल्या पावणेदोन वर्षांत तब्बल २६ घटना तर वर्षभरात तेरा घटना घडल्या आहेत. मग देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात येत असलेला निधी कुठे मुरतो, याचा विचार करून पीएमपीलाच जाब विचारण्याची वेळ आली आहे. दररोज १७५ गाडय़ा रस्त्यावर नादुरुस्त होऊन त्या रस्त्यावरच बंद पडतात. देखभाल दुरुस्तीच्या खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. पण, कोणीही काही त्याबाबत विचारत नाही.

पीएमपी ही स्वायत्त कंपनी आहे, कंपनीचे कायदे स्वतंत्र आहेत, पीएमपी कोणाला उत्तर देण्यास जबाबदार नाही, असाच काहीसा अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला आहे. या अनागोंदी कारभारामुळे प्रवासी संख्या झपाटय़ाने कमी होत असून उत्पन्नावरही त्याचा विपरीत परिणाम दिसतो. तोटा झाला की पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तो भरून काढणार, नव्हे तो भरून काढावाच लागणार, हे पक्के ठावूक असल्यामुळे वर्षांनुवर्षे प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे तक्रार निवारण कक्ष नावापुरताच राहिला आहे. तक्रार कागदोपत्री सोडविली जाते, असाच लाखो प्रवाशांचा आजवरचा अनुभव आहे. स्थानके, बसथांबे मोडकळीस आलेले आहेत. नादुरुस्त गाडय़ा रस्त्यावर येत आहेत. सेवेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे लाखो प्रवाशांसाठी पीएमपी बेभरवशी ठरलेली आहे, हे वास्तव आहे. प्रवासीकेंद्रित निर्णय, स्वस्त, सुरक्षित, स्वच्छ, भरवशाचा कारभार केवळ कागदावरच राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:01 am

Web Title: article about pmpml condition in pune
Next Stories
1 बालकांमधील विषाणू संसर्ग वाढला
2 निवडणूक कामासाठी ६० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता
3 ‘प्रियंकांमध्ये दिसते इंदिरांची छबी, काँग्रेसला होणार फायदा’
Just Now!
X