चिन्मय पाटणकर
रंगभान या नाटय़लेखकांसाठीच्या प्रयोगशाळेतून पाच नव्या नाटय़कृती लिहिल्या गेल्या. या नव्याकोऱ्या नाटय़कृतींच्या वाचनाचा रंगभान महोत्सव ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान ज्योत्स्ना भोळे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
नाटक घडण्यासाठी दोन घटक महत्त्वाचे असतात. एक म्हणजे नट आणि दुसरं म्हणजे प्रेक्षक.. पण नाटक घडण्यासाठी नट आणि प्रेक्षक एवढेच पुरेसे असतात असंही नाही.. नाटय़ उभं राहातं ते संहितेच्या जोरावर.. संहिता जितकी सकस, तितका सकस नाटय़ानुभव! सध्याच्या माध्यमकल्लोळात नवे नाटककार निर्माण होत नसल्याचं वारंवार बोललं जातं. या पार्श्वभूमीवर नव्या जाणिवांची नाटकं लिहिली जाण्याच्या उद्देशाने, नव्या प्रतिभेचे नाटककार निर्माण करण्याच्या संकल्पासह साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान, महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि निखिल राणे फाउंडेशन यांच्यातर्फे जवळपास दीड वर्ष ३२ नवलेखकांना ‘रंगभान’ देण्यात आलं. नाटय़लेखनाच्या या अभिनव प्रयोगशाळेतून पाच नवी नाटकं गवसली आहेत.
राज्यभरातील लेखकांतून जवळपास ३२ लेखकांना या प्रयोगशाळेसाठी निवडण्यात आलं. मोहित टाकळकर, अनिरुद्ध खुटवड, आशुतोष पोतदार, डॉ. चंद्रशेखर फणसळकर, शशांक शेंडे, अजित दळवी, अतुल पेठे, संतोष शिंत्रे, माधुरी पुरंदरे, राजीव नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकर्मी-लेखक-समीक्षकांनी या लेखकांना मार्गदर्शन केलं. तर किरण यज्ञोपवीत आणि प्रदीप वैद्य यांनी लेखकांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केलं.
लेखकांसाठी नाटय़बीज ते परिपूर्ण नाटय़संहिता या प्रवासासाठी विविध सत्रे घेण्यात आली. या सत्रांतून लेखकांनी स्वतच्या कल्पनांसाठी वेळ दिला. या प्रयोगशाळेतून ‘मीतू’, ‘हायपर बोला’, ‘विषामृत’, ‘व्होल बॉडी मसाज’, ‘हॅपी अवर्स’ या नव्या संहिता निर्माण झाल्या आहेत. अनुक्रमे अश्विनी देशपांडे, सुजय जाधव, घनश्याम रहाळकर, डॉ. हर्षवर्धन श्रोत्री, गायत्री लघाटे यांनी या संहिता लिहिल्या आहेत. ‘रंगभान’ महोत्सवात या संहितांचं अभिनीत वाचन (अभिनयासह वाचन) केलं जाणार आहे. अभिनेता गिरीश कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, मृण्मयी गोडबोले, श्रीकांत भिडे, क्षितिश दाते, देवेंद्र गायकवाड आदी कलाकार हे वाचन करतील. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
‘रंगभान या उपक्रमातून पाच नव्या नाटय़कृती निर्माण झाल्या हे प्रयोगशाळेचं यश आहेच, मात्र लेखकांचं एक वर्तुळ निर्माण झालं. त्यांच्यात सृजनशील देवाणघेवाण होऊ लागली हे महत्त्वाचं आहे. पाच नाटय़कृतींशिवाय अन्य लेखकांच्या नाटय़कल्पनाही तितक्याच ताकदीच्या आहेत. त्या पुढील काळात नाटय़रूपाने पुढे येतील, याची खात्री आहे. मात्र, या लेखकांनी अन्य लेखकांना जोडून घेतल्यास लिहित्या हातांचं वर्तुळ आणखी मोठं होण्यास मदत होईल. रंगभान ही बऱ्याच काळानंतर झालेली प्रयोगशाळा आहे. अशा प्रकारची प्रयोगशाळा होत राहणं महत्त्वाची आहे,’ असं किरण यज्ञोपवीत यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 1:36 am