श्वान विक्रीबरोबरच त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि या व्यवसायाबरोबरच सामाजिक भान जपत रस्त्यावरील जखमी प्राण्यांवर उपचार अशी सर्व कामे स्वप्नील राणे यांची पेट वर्ल्ड कंपनी करते. श्वान विक्रीचा व्यवसाय करताना त्यांनी सामाजिक भानही जपले आहे. रस्त्यावरील जखमी श्वान, मांजर किंवा अन्य जखमी वा बेवारस प्राण्यांवर उपचार करून त्यांना दत्तक देण्याचे किंवा अशा प्राण्यांना सांभाळणाऱ्या संस्थांकडे त्यांना देण्याचे कामही ते करतात. पुण्याबरोबरच बाहेरील शहरांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

स्वप्नील राणे या तरुणाने पेट वर्ल्ड नावाची कंपनी २०१६ मध्ये स्थापन केली. कंपनीतर्फे लॅब्रेडॉर, रॉट व्हायलर, सायबेरियन हस्की, सेंट बर्नार्ड, बॉक्सर, कारवान अशा विविध जातींच्या श्वानांची विक्री केली जाते. तसेच श्वानांना प्रशिक्षण देण्याचेही काम केले जाते. स्वप्नील हे मूळचे जळगावचे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त ते पुण्यात आले. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वप्नील यांनी दहा वर्षे एका खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र, लहानपणापासूनच प्राण्यांबद्दल विशेष ममत्व असल्याने त्यांनी याच क्षेत्रात व्यवसाय करायचे ठरवले. श्वान विक्रीबरोबरच त्यांना प्रशिक्षणही देण्यात येते. तसेच रस्त्यावरील विविध जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांचा सांभाळही केला जातो.

स्वप्नील यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना अनेकविध अडचणींना तोंड द्यावे लागले. सुरुवातीला घरगुती स्वरूपात श्वान विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्यामुळे साहजिकच ते राहतात, त्या ठिकाणी सोसायटीने आक्षेप घेतला. त्यानंतर सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी घेतले. तसेच विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक श्वानाची नोंद महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात केली. याबरोबरच ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.

समाजमाध्यमे, मौखिक प्रचार, डॉग शो अशा विविध माध्यमांतून ग्राहकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न ते करतात. त्याला बऱ्यापैकी यश आले असून आतापर्यंत स्वप्नील यांनी विविध जातींच्या श्वानांच्या अनेक पिलांची विक्री केली आहे. हल्ली आक्रमक श्वानांऐवजी खास घरी पाळण्यासाठी पामेरियन, लासा, शिट्सझु अशा टॉय डॉगना विशेष मागणी आहे.

‘लहानपणापासून प्राण्यांची, विशेषत: श्वानांची आवड होती. आवडीचे रूपांतर व्यवसायात करण्याचीही इच्छा होती. परंतु, काही कौटुंबिक अडचणींमुळे दहा वर्षे एका खासगी कंपनीत नोकरी करावी लागली. त्यानंतर २०१६ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन श्वान विक्री आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. व्यवसायाच्या सुरुवातीला ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान होते. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गामध्ये श्वान विकत घेण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. सामान्य नागरिकांमध्ये ज्यांना आवड आहे, असेच लोक श्वान पाळतात असा अनुभव आहे. सर्वसामान्यपणे सोसायटय़ांमध्ये श्वान पाळण्याला बंधने आहेत, त्यामुळेही अनेकांना श्वान पाळण्याची हौस भागवत येत नाही,’ असे स्वप्नील यांचे निरीक्षण आहे.

श्वानांना प्रशिक्षण देण्याचे, वागणूक (बिहेविअर) आणि रक्षण (गार्ड ट्रेनिंग) असे सर्वसाधारण दोन प्रकार आहेत. श्वान पाळणाऱ्या घरातील मुख्य व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आज्ञा त्याने पाळण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण श्वानांना दिले जाते.

त्यानुसार अनोळखी व्यक्ती घरी आल्यानंतर श्वानाने कसे वागले पाहिजे, फिरायला गेल्यानंतर, सार्वजनिक ठिकाणी काय करायचे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच गार्ड ट्रेनिंगमध्ये कोणत्या ठिकाणाची राखण करायची याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी श्वान तीन महिन्यांचा असणे बंधनकारक आहे, कारण त्याची तीन महिन्यांत पुरेशी वाढ झालेली असते. तर, प्रशिक्षणाचा कालावधी सुमारे चार महिन्यांचा असतो. श्वान विकत घेतल्यानंतर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये त्याची नोंद करावी लागते. तर, डॉग शोच्या माध्यमातून विशिष्ट जातीच्या श्वानांसाठी चैन्नई येथे संबंधित श्वानाच्या वंशावळीची कागदपत्रांद्वारे नोंदणी केली जाते. विविध कंपन्यांकडून श्वानांना गार्ड ट्रेनिंग देण्याकडे हल्ली कल वाढत आहे. स्वप्नील यांनी आतापर्यंत तीस श्वानांना प्रशिक्षण दिले आहे.

स्वप्नील यांनी व्यवसाय करताना सामाजिक भानही जपले आहे. रस्त्यावरील जखमी श्वान, मांजर किंवा अन्य बेवारस प्राण्यांवर उपचार करून त्यांना दत्तक देण्याचे किंवा अशा प्राण्यांना सांभाळणाऱ्या संस्थांकडे त्यांची रवानगी करण्याचेही काम ते करतात. त्याकरिता डॉग लव्हर्स आणि डॉग सेलर्स अशा दोन समूहांशी ते जोडले गेले आहेत. खास श्वानांना खेळण्यासाठी पुण्यातील नाना-नानी पार्क येथे दर रविवारी सकाळी आठ ते नऊ ही वेळ निश्चित केली आहे. तेथे स्वप्नील त्यांच्याकडील श्वानांना घेऊन जातात.

‘सध्या घरगुती स्वरूपातच व्यवसाय करत असल्याने निश्चितच व्यवसायाला मर्यादा आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच श्वान विक्रीचे विशेष दुकान उघडण्याचा मानस आहे. तसेच श्वान, मांजर आणि पाळीव मासे यांच्यासाठी लागणारे अन्न याचा व्यवसायही मोठय़ा प्रमाणात सुरू करायचा आहे. याबरोबरच पुण्याबाहेर श्वान विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,’ असेही स्वप्नील सांगतात.