श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

पुणे आणि परिसरात महिला आणि बालकल्याण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या समाजसेवी संस्थांमध्ये ‘भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे’ हे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. एकाच छत्राखाली शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक, व्यवसाय मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत व्यापक स्वरूपाचे योगदान संस्था देत असून आजवर  ३० हजार जणांना याचा लाभ झाला आहे. आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या अनेक महिला संस्थेत निरलसपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात, ही संस्थेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

कुटुंब हा केंद्रबिंदू मानून महिला आणि बालकांच्या सर्वागीण उन्नतीसाठी लीला शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली ‘भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे’ या सेवाभावी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. काळाची पावले ओळखून समाजाच्या बदलत्या गरजांनुसार संस्थेने विनामोबदला विविध उपक्रम सुरू केले. सुरुवातीला महिलांसाठी जनसहवास शिबिरे, कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे, मुलांसाठी सुटीतील शिबिरे, महिलांनी स्वावलंबी व्हावे म्हणून वृद्धसेवा आणि रुग्णसेवा प्रशिक्षण व ब्युरो आणि अन्य उपक्रम सुरू करण्यात आले.

चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेचे सगळे उपक्रम पुण्यापुरतेच मर्यादित न ठेवता पुण्यापासून वीस कि मी. अंतरावर, आळंदी रस्ता, दिघीसारख्या छोटय़ा गावातही ते सुरू झाले. ज्या काळात संगणकाची फारशी ओळख नव्हती तेव्हापासून म्हणजे १९९२ पासून महिला आणि मुलांसाठी  दिघी येथे संगणक वर्ग सुरू करण्यात आले. या संगणक वर्गात नुकताच विद्यार्थ्यांंच्या सर्जनशीलतेला तसेच तर्कबुद्धीला वाव देण्यासाठी scratch programming चा अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून ज्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नाही अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेने अभ्यासिकाही सुरू केल्या आहेत. शिक्षण आनंददायी व्हावे, अभ्यास कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी अभ्यासिकेत विविध उपक्रम राबविले जातात. अभ्यासिकांमध्ये विद्यार्थी टॅब आणि कॉम्पुटर वापरतात. त्यांच्या भाषा आणि गणिताच्या अध्ययनासाठीदेखील विशेष प्रयत्न केले जातात.

संस्थेचे सुसज्ज विज्ञान केंद्र दिघी येथे असून तेथे मुले आणि शिक्षक नवनवीन कल्पना राबवतात. इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमातील प्रयोग करून दाखवण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक स्वत: प्रयोगांचे साहित्य बरोबर घेऊन दिघी, भोसरी, पुणे, भूगाव, भूकुम, येथील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांत जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:लाही प्रयोग, प्रकल्प करून बघण्याची संधी मिळते. हे विद्यार्थी स्वतंत्ररीत्या वैज्ञानिक प्रकल्प सादर करून प्रदर्शनात भाग घेतात. बक्षिसे मिळवतात. संस्थेतर्फे मुलांसाठी रोबोटिक्सच्या कार्यशाळांचेही आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्याबरोबरीनेच संस्थेच्या तज्ज्ञ शिक्षिका शालेय शिक्षकांसाठी बाहेरगावी जाऊनही प्रशिक्षण देतात.

शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांंच्या शारीरिक तसेच मानसिक विकासाकडे लक्ष दिले जाते. जीवनातील अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचा टप्पा म्हणजे किशोर वय. संस्थेचा किशोरवयीन मुलांसाठी एक आगळावेगळा उपक्रम आहे. विविध शाळांमध्ये जाऊन व्याख्याने, फिल्म शो, समुपदेशन, पथनाटय़, सुटीतील शिबिरे यांचे आयोजन केले जाते. मुलामुलींना स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने कराटे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धामध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊ न पारितोषिके पटकावली आहेत.

सर्वसामान्य मुलांबरोबर शाळांमध्ये शिकणाऱ्या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे उच्चार सुधारण्यासाठी आणि त्यांना चांगले संभाषण करता यावे यासाठी ‘शब्द संस्कार’ या वाचा सुधार केंद्रामार्फत कार्य केले जाते. या केंद्रातर्फे दरवर्षी समावेशित शिक्षण योजनेतील शाळातील मुलांसाठी स्पर्धा आणि शिबिरे आयोजित करण्यात येतात.

बारावीनंतर पुढील शिक्षण घेणाऱ्या तसेच संशोधनात्मक काम करणाऱ्या गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना संस्थेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. याच विद्यार्थिनींना करिअर मार्गदर्शनदेखील दिले जाते. महिलांनी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हावे यासाठी संस्थेने स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. याअंतर्गत कॉम्प्युटर कोर्सेस, फॅशन डिझाईन ,फॅशन बॅग, कापडी पिशव्या, हर्बल प्रॉडक्ट्स, बेकरी प्रॉडक्ट्स, ब्युटीशियन, पी.सी.बी.असेम्ब्ली या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. या मार्गदर्शनातून काही स्त्रियांनी स्वत:चे छोटे उद्योगही सुरू केले आहेत. संस्थेचेही छोटेखानी उद्योगकेंद्र आहे. ऋजुता पितळे या संस्थेच्या उपाध्यक्ष, तर वंदना केळकर या सचिव म्हणून कार्यरत असून संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी, संस्थेमार्फत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ८२७५७६५७३४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पुणे व दिघी येथे संस्थेमार्फत मोफत होमिओपॅथी आणि बाराक्षार दवाखाने चालवले जातात. औषधोपचाराबरोबरच समुपदेशन, पुनर्वसनासाठी मार्गदर्शन,आहार व आरोग्य विषयक व्याख्याने आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे सेवाभावी काम पाहून पस्तीस वर्षांपूर्वी त्या वेळचे दिघीचे सरपंच दत्ता गायकवाड ह्यंनी संस्थेला जागा दिल्यामुळे दिघी येथे संस्थेची स्वत:ची तीन मजली इमारत उभी आहे. इथे महिलांसाठी शांत आणि सुरक्षित वसतिगृह चालविले जाते. नोकरदार महिला, विद्यार्थिनी आणि काही अंध मुलीसुद्धा याचा लाभ घेतात.

महाराष्ट्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या चांगल्या कामाला दिलेली दाद म्हणून गेली २५ वर्षे संस्थेतर्फे दरवर्षी ‘सरस्वती समाजसेवा पुरस्कार’ दिला जातो. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंसाठी वक्तृत्व स्पर्धाचेही आयोजन करण्यात येते. वाचन परंपरेला प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेचे ‘रसमयी वाचन मंडळ’ विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करते. अशा विविध प्रकारच्या उपक्रमांमुळे संस्थेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचले आहे.