श्रीराम ओक

केवळ चर्चा आणि कृती यात खूप फरक आहे. हा फरक दाखवून देण्यासाठी आवश्यक ती कृती करण्याचे आणि संदेशात्मक उपक्रम राबविण्याचे काही सायकलपटूंनी ठरविले. या ठरविण्यानंतर त्यांनी नऊशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर केला. त्यानंतर त्यांचा अनेकांनी बहुमान केला. त्या बहुमानाचे त्यांना कौतुक आहेच, पण त्याहीपेक्षा स्वत:तील आत्मविश्वास वृद्धिंगत झाला, हा बहुमानही त्यांना तितक्याच मोलाचा वाटतो.

शारीरिक क्षमतेच्या महत्त्वापासून पर्यावरणपूरक संदेशांपर्यंत आणि सैन्यदलाचा अभिमान दर्शविण्यापासून मतदानापर्यंत असे विविध आठ संदेश देत  नऊशे किलोमीटरची सायकल यात्रा पाच सायकलस्वारांनी नुकतीच पूर्ण केली. आपल्या स्वत:च्या शारीरिक-मानसिक क्षमतांच्या वाढीबरोबरच नियोजन करीत सराव करण्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपले काही महिने देशाच्या एकात्मतेला समर्पित केले. केवळ संदेश देणे, उपदेश करणे यापासून दूर राहात त्यांनी स्वत:च्या कृतीतून लहान मुलांचे मैदानावर खेळणे हे त्यांच्या शारीरिक विकासात किती आवश्यक आहे, हे दाखवून दिले. या सायकल यात्रेत तेरा वर्षांच्या विराज शहा याने केलेली कामगिरी ही स्पृहणीय अशीच म्हणावी लागेल.

मतदान करा, नदी वाचवा-पाणी वाचवा, झाडे लावा-पुढच्या पिढीसाठी झाडे जगवा, भारतीय सेनादलांचा आम्हांला अभिमान आहे, खेलो इंडिया, मुलांना लहान वयातच अर्थशास्त्र शिकवा, हेल्थ इज वेल्थ, भारतातील तीर्थस्थानांचे रक्षण करा असे वेगवेगळे आठ सामाजिक संदेश देत पाच जणांनी नुकतीच पुणे ते पालीताना (गुजरात) अशी नऊशे किलोमीटरची सायकल यात्रा केली. मुख्य म्हणजे या यात्रेमध्ये मोठय़ा वयाच्या मंडळींबरोबरच विराज राहुल शहा हा तेरा वर्षांचा मुलगाही सहभागी झाला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात म्हणजे २० मार्चला पहाटे आदिनाथ सोसायटी येथील आदिनाथ मंदिरापासून ही यात्रा निघाली होती. सात दिवसांमध्ये म्हणजे २७ मार्चला भर उन्हामध्ये या पाच वीरांनी गुजरात येथील पालीताना गाठले. तेथे गेल्यानंतर त्यांनी जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदेश्वर यांचे दर्शन घेतले. या सायकलयात्रेत विराजच्याबरोबर त्याचे वडील राहुल दीपक शहा, सत्यन रायकुमार शहा, मंदार हिम्मतलाल शहा, उत्तम रमेशलाल धोका यांनी सहभाग नोंदविला होता. यातील राहुल हे केवळ नोकरी करणारे, तर त्यांचे इतर तीन मित्र हे व्यावसायिक.

प्रत्येक दिवसाच्याशेवटी राहण्यासाठी त्यांनी धर्मशाळांमध्ये राहणे पसंत केले. पहिल्या दिवशी पनवेल, दुसऱ्या दिवशी मनोर, तिसऱ्या दिवशी तिथ्थल, चौथ्या दिवशी कामरेज, पाचव्या दिवशी अनास्थु, सहाव्या दिवशी वटामण चोकडी, सातव्या दिवशी आयोध्यापुरम आणि आठव्या शेवटच्या दिवशी पालिताना येथे ही यात्रा पोहोचली.

आठ दिवस आठ विविध संदेश देणाऱ्या या यात्रेने नकळत जो संदेश दिला तो म्हणजे प्रदूषणविरहित वाहन म्हणजे सायकलच्या वापरामुळे पर्यावरणरक्षण आणि आरोग्यरक्षणही होऊ शकते. मतदानाच्या दिवशी असलेल्या सुटीनिमित्त बाहेरगावी जाण्यापेक्षा मतदान करा, मतदानाचा हक्क बजावा, याशिवाय मोबाईल-व्हिडीओ गेम आदींपासून मुलांना दूर ठेवा, त्यांना मैदानावर खेळायला पाठवा. पाणी तर वाचवाच, पण पाण्याचा स्रोत म्हणजे नदी, तीदेखील वाचवा अशा प्रकारचे संदेश त्यांनी या निमित्ताने दिले. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाताना जी मंडळी भेटली त्यांनी केवळ या लोकांचेच कौतुक न करता, पुणेकरच असे वेगळे काही करु शकतात असे म्हणत पुणेकरांच्या वेगळेपणाचेदेखील आवर्जून कौतुक केले.

या सायकल यात्रेमुळे अपंग मुलांना रोबोटिक्स शिकवणाऱ्या विराजला नेतृत्वगुण, संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, एखादा प्रकल्प कसा साकारायचा, अनेक गोष्टी एका वेळी कशा करायच्या अशा विविध गोष्टींचे ज्ञान झाल्याचे विराज सांगतो.

या यात्रेदरम्यान रोज सुमारे शंभर ते एकशेपंधरा किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. यापूर्वी राहुल शहा यांनी वारीच्या दरम्यान एकटय़ानेच पंढरपूर यात्रा सायकलवर केली होती. त्यानंतर त्यांनी या यात्रेचे नियोजन केले. या यात्रेतील सगळीच मंडळी सायकलपटू आहेत, ते नित्यनियमाने सायकल चालवितातच, पण या सायकल यात्रेसाठी त्यांनी दीड महिना रोज पस्तीस ते चाळीस किलोमीटर सायकल चालवली. रांजगणगाव आणि थेऊर येथे ते वारंवार जायचे, यामागचे मुख्य कारण म्हणजे महामार्गावरील सायकलप्रवासाचा सराव. याशिवाय चांदणी चौकातही जायचे, तसेच पर्वती चढणे आणि प्राणायाम करायचे. सायकलींच्या देखभालीबरोबरच प्रवासादरम्यान त्यांनी कपडय़ांना रेडियम स्टिकर्स लावले होते. या प्रवासादरम्यान फळे तसेच द्रवपदार्थाचे सेवन करत सर्वाधिक उन्हाशी सामना करता आल्याने या सायकलपटूंना कमी त्रासाला सामोरे जावे लागले. पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळावी, यासाठी रोज सकाळी सायकलप्रवासाला निघताना शंखनाद करुन सुरुवात करत असल्याचे राहुल यांनी सांगितले. याशिवाय ताक, शहाळ्याचे पाणी आदींचाही या यात्रेदरम्यान त्यांनी केलेला वापर ऊर्जादायी ठरल्याचे हा चमू सांगतो. या सायकल यात्रेनंतर येत्या वर्षांत बाराशे किलोमीटर आणि अठराशे किलोमीटर सायकल यात्रेचे आयोजन करण्याचा मानसही राहुल यांनी बोलून दाखवला.