श्रीराम ओक

शिकवण्याचे गुण असल्यामुळे मुलांसाठी काही काम करण्याची संधी, त्या तिघींना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांच्यापैकी एक शोभना बिजूर यांना मुख्याध्यापिका पदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुलांसाठी काम करण्याची इच्छा होती. ही इच्छा एका शाळेच्या उभारणीत सहभागी होण्याच्या निमित्ताने पूर्ण तर झालीच, त्याचबरोबर आपल्या गुरूंच्या, वसंत साने यांच्या संकल्पासाठी अनुराधा काळे आणि सुमती फाटक यांच्या सहकार्याने वाचनसंस्कृती जपण्यात मोलाचे कार्यही त्यांनी केले.

वाचन हा शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा; मग ते अभ्यासातील पुस्तकांचे वाचन असो वा अवांतर पुस्तकांचे. शालेय पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांनी निवड करण्याचा काही प्रश्न नसला तरी अवांतर वाचन करताना मात्र हा प्रश्न पडतो. हा प्रश्न केवळ मुलांनाच नाही, तर मुलांना काय वाचायला आवडेल, त्यांना वाचण्यासाठी कोणती पुस्तके द्यावीत, हा प्रश्न मोठय़ांनाही पडतो. वाचनसंस्कृती रुजावी म्हणून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. शहरातील मुलांना आपल्यासाठी कोणती पुस्तके उपलब्ध आहेत, याची जाणीव जशी असते, तशीच ती सहजतेने उपलब्धदेखील होतात. मात्र ग्रामीण भागातील मुलांना पुस्तके सहजतेने उपलब्ध होणे, जसे दुरापास्त तसेच पुस्तकांची माहिती मिळणेदेखील. यावरील एक उपाय करीत त्र्याण्णव वर्षांचे निवृत्त शिक्षक वसंत साने यांनी एक संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या दोन विद्यार्थिनी शोभना बिजूर, अनुराधा काळे आणि सहशिक्षिका सुमती फाटक यांची मदत घेतली.

मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालयात मराठी शिकविणारे साने हे सध्या सोलापूरजवळील हराळी येथील ज्ञानप्रबोधिनीमध्ये वास्तव्यास असतात. आपल्या शाळेतील पाचवी ते दहावीच्या मुलांना आणि शिक्षकांच्या अवांतर वाचनासाठी पुस्तके खरेदी करण्याचा त्यांचा संकल्प होता. यासाठी त्यांच्या दोन विद्यार्थिनी शोभनाताई, अनुराधाताई आणि त्यांच्या खार येथील शाळेतील सहशिक्षिका सुमतीताई यांची निवड केली. या तिघींनीदेखील ही जबाबदारी आनंदाने स्वीकारत पुण्यात या पुस्तकांची खरेदी करण्याची मोहीम सुरु केली. पाऊण लाख रुपये ही रक्कम साने यांनी या पुस्तक खरेदीसाठी निश्चित केली होती आणि ती त्यांनी आपल्या विद्यार्थिनींना पाठवून दिली होती. आता पैसे हाताशी होते, पण गरज होती ती योग्य पुस्तकांच्या निवडीची.

स्फूर्ती, प्रेरणा देण्याबरोबरच मनोरंजनही करतील अशा पुस्तकांची निवड करीत असताना या तिघींची कसोटी होती. वेगवेगळ्या ग्रंथभांडारात जाऊन पुस्तके वाचून निवडण्यास सुरुवात करण्यात आली. काही पुस्तके पूर्वी वाचली होती, पण बराच काळ लोटला होता. काही नव्या तसेच बदलत्या काळाप्रमाणे असलेली, मुलांच्या वयानुसार पुस्तकांची निवड त्या करीत होत्या. शिक्षकांसाठीची निवड वेगवेगळ्या निकषांवर सुरु होती. पुस्तक दुकानदारांनी केलेले सहकार्य आणि या तिघींची मेहनत यातून पुस्तकांची खरेदी केली. त्यानंतर इयत्तेनुसार विद्यार्थ्यांसाठीची आणि शिक्षकांच्या पुस्तकांची वर्गवारी केली. प्रत्येक गठ्ठय़ाबरोबर पुस्तकाचे, लेखकाचे नाव असलेली यादी ठेवण्यात आली. ह्य़ा पुस्तकपेटय़ा हराळीला पोहोचविण्याची जबाबदारी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने पार पाडली. हराळी येथे एका कार्यक्रमात ही पुस्तकभेट विद्यार्थी-शिक्षकांना देण्यात आली.

या संकल्पातील अनुराधाताई या मुंबईतील एका संस्थेत सामाजिक कार्य करीतच होत्या, ज्या सध्या पुण्यात मुक्कामी आहेत. तर शोभनाताई यांचे आपल्या पूर्वाश्रमीच्या नोकरीला अनुसरून सामाजिक कार्य सुरु आहे. विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयात १९८२ ते १९८९ पर्यंत मुख्याध्यापिका म्हणून काम करुन त्या निवृत्त झाल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांना काही काळ ग्राममंगलबरोबर विदर्भातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळाली.

कार्ला गावात इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्यामुळे तेथील मुलांना लोणावळा येथील शाळेत जावे लागत होते. त्यांची ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने पुणे-मुंबई महामार्गाजवळ ‘परिज्ञानाश्रम विद्यालय’ ही शाळा २०१२ साली सुरु करण्यात आली. या शाळेत शोभनाताईंना रचनात्मक पद्धतीने शिकविण्याचे स्वातंत्र्य मिळाले. शाळेची इमारत बांधली जाईपर्यंत सुरुवातीला ‘विकासघर’ हा प्रकल्प श्री ट्रस्टमार्फत तेथे सुरु करण्यात आला. कार्ला गावातील सतरा मुले या विकासघरात दाखल झाली. या विकासघरात २०१४ पर्यंत मुलांची संख्या ९६ पर्यंत गेली. त्या वेळी श्रीट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने तेथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

२०१५ मधे शाळेची स्थापना झाली. नर्सरी आणि ज्युनियर केजीचे वर्ग सुरु झाले, त्या वेळी २४ मुलांनी नावे नोंदवली गेली. जिल्हा परिषदेची परवानगी मिळाल्यानंतर २०१६ मध्ये दोन एकर जागेवर पूर्व प्राथमिक शाळेची इमारत अवघ्या दोन महिन्यात उभी राहिली. २०१७ मध्ये पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा सुरु करण्याची परवानगी मिळाली आणि प्राथमिक विभागाची स्थापना झाली. या शाळेमुळे पूर्व प्राथमिकच्या वर्गात १८० विद्यार्थ्यांची, तर पहिली ते सहावीपर्यंतच्या ११६ विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमात शिकण्याची सोय उपलब्ध झाली. येथे येणारी मुले आजूबाजूच्या पाच-सहा खेडय़ांमधून येतात. या विद्यार्थ्यांपैकी बहुतेकांचे पालक रिक्षाचालक किंवा छोटामोठा व्यवसाय करणारे आहेत. त्यांपैकी अनेकांचे जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेले आहे, परंतु आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळावे ही त्यांची दुर्दम्य इच्छा आहे. या शाळेत पहिलीपासूनच संस्कृत विषयाचे अध्यापनही केले जाते. शोभनाताई मागील शैक्षणिक वर्षांपर्यंत या शाळेत कार्यरत होत्या. यंदाच्या वर्षीपासून त्यांनी आठवडय़ातील एक दिवस या उपक्रमासाठी राखून ठेवला आहे.

पुस्तकांच्या, शाळेच्या निमित्ताने आपला वेळ आणि अनुभव यांचा सदुपयोग करणाऱ्या या ज्ञानदानकर्त्यांच्या कार्याने अनेकानेक मुलांना वाचनाची आणि शिक्षणाची नवी ऊर्मी तर मिळालीच; याशिवाय उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीत पुस्तके आणि गुरू यांचे मार्गदर्शनही मिळत आहे, हे महत्त्वाचे.

shriram.oak@expressindia.com