22 July 2019

News Flash

आमची सोसायटी : सुंदरसृष्टी सोसायटी

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात पाच इमारती आणि एकशे वीस सदनिकांची सुंदरसृष्टी हाउसिंग सोसायटी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रथमेश गोडबोले

सिंहगड रस्त्यावर सनसिटी परिसरात सुंदरसृष्टी हाउसिंग सोसायटी आहे. सोसायटीत वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक, स्वच्छता विषयक उपक्रम, मुक्कामाच्या सहली असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यात लहान मुले, तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही सक्रिय सहभाग असतो. वर्षभरातील सर्व उत्सव केवळ साजरे न करता त्यांचे औचित्य साधून विविध उपक्रमही राबवण्यात येतात. वर्षभरात सहली आयोजित करणे, नाटक बसवणे, खत प्रकल्प चालवणे असे उपक्रम आयोजित केले जातात. एकोपा जपणारी सोसायटी अशी या सोसायटीची ओळख आहे.

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात पाच इमारती आणि एकशे वीस सदनिकांची सुंदरसृष्टी हाउसिंग सोसायटी आहे. एकोपा जोपासणारी आणि सोसायटीमधील प्रत्येक सदस्याचे एकमेकांशी कौटुंबिक नाते असणारी सोसायटी अशी या सोसायटीची ओळख आहे. सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात सोसायटीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो. गणेशोत्सव, दिवाळीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्न, धान्य आणि कपडे वाटप करण्याच्या उपक्रमातून सोसायटीने सामाजिक भान मोठय़ा प्रमाणात जपले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी कल्याण आश्रमातर्फे दर महिन्याला स्वयंसेवक सोसायटीमध्ये येतात. त्यांना सोसायटीमधील सदस्यांकडून धान्य दिले जाते. त्यानंतर या धान्याचे वाटप आदिवासी नागरिकांना केले जाते. हा उपक्रम वर्षभर प्रत्येक महिन्यातून एकदा राबवला जातो.

याबरोबरच सोसायटीमधील काही सदस्यांकडून जुने-नवे कपडे गोळा करून त्यांचेही गरजू लोकांना वाटप केले जाते. सोसायटीमध्ये गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवात महिलांचा खास नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यात युवतींसह महिलांचा सक्रिय सहभाग असतो. याबरोबरच लहान मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. तसेच दरवर्षी गणेशोत्सवात एक नाटक बसवून ते सादर केले जाते. सोसायटीमधील सदस्य त्यामध्ये विविध भूमिका करतात. बहुतांश वेळा सोसायटीचे सदस्य प्रदीप प्रभुणे हेच नाटक लिहितात आणि त्याचे दिग्दर्शन करतात. गणेशोत्सवाची सांगता पारितोषिक वितरण कार्यक्रमाने होते.

सोसायटीकडून दिवाळी सणही मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये सोसायटीच्या सदस्यांकडून ‘शब्दसृष्टी’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात येतो. दिवाळीच्या आधी एक पत्रक काढून सोसायटीमधील सदस्यांना दिवाळी अंकासाठी लिखाण करण्याबाबत आवाहन करण्यात येते. या उपक्रमाला सर्वाचाच प्रतिसाद असतो. विविध वयोगटातील सदस्य विविध विषयांवर लेखन करतात. ते लेखन दिवाळी अंकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येते. कथा, कविता, माहितीपर लेख असे दिवाळी अंकाचे स्वरूप असते. गेल्या दोन वर्षांपासून दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात येत आहे. यापुढेही प्रत्येक वर्षी दिवाळी अंक काढण्याचे सोसायटीकडून ठरवण्यात आले आहे. तसेच सोसायटीमधील लहान मुलांकडून दिवाळीत किल्ला बनवला जातो. याबरोबरच वर्षांतून दोन वेळा सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत सहली आयोजित केल्या जातात. त्यामध्येही सोसायटीमधील सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो.

सोसायटीकडून आगामी काळात सोसायटीमधील प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. त्यामध्ये इमारतींच्या गच्चीला पांढरा रंग दिला जाणार असून, त्या भिंतींवर लहान मुलांकडून त्यांच्या कल्पनेनुसार चित्र काढून घेतली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी चित्रकला क्षेत्रातील नामवंतांना परीक्षक म्हणून बोलावले जाणार आहे, अशी संकल्पना आहे. या स्पर्धेतून लहान मुलांच्या कल्पनांना वाव मिळणार असून इमारतीच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. सोसायटीमधील प्रत्येक सदनिकेमध्ये इंटरकॉमची सुविधा असल्याने सर्व सदस्य नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात आणि गरजेच्या वेळी मदतीलाही धावून जातात. सोसायटीच्या आवारात ओल्या, सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खत प्रकल्पही उभारण्यात आला आहे. त्यामुळे सोसायटीमधील कचरा सोसायटीमध्येच जिरवला जातो आणि या माध्यमातून सोसायटीने स्वच्छतेचा संदेशही दिला आहे.

सोसायटीतील युवक-युवतींसह ज्येष्ठ नागरिकही सामाजिक कार्यात सहभागी असतात. शहराच्या विविध भागांतून, परगावहून आलेली कुटुंब सोसायटीमध्ये गुण्यागोविंदाने वास्तव्य करत आहेत. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. नवीन विचार-आचाराची सोसायटी तसेच सोसायटीने राबवलेल्या उपक्रमांसाठी सुंदरसृष्टी सोसायटी ओळखली जाते. एकाच सोसायटीत राहत असल्याने सर्व कुटुंबांमध्ये परस्पर जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले असून सर्व सभासद एका कुटुंबाप्रमाणे कार्यरत आहेत. त्याचा फायदा एखादा उपक्रम, मोहीम राबवण्यासाठी होतो. लवलेश पराशर हे सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. चंद्रशेखर तांबे सचिव आहेत. तर, उमेश करमरकर, सुशांत शुक्ला, मोहन मुलबागल, आशुतोष रांजेकर, मिलिंद फडके, प्रदीप प्रभुणे हे सदस्य आणि सोसायटीतील अनेकजण सोसायटीतील सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात.

First Published on March 15, 2019 12:51 am

Web Title: article on sunderashrishti society