पुणे- मुंबई दरम्यानच्या प्रवाशांची सर्वात लाडकी गाडी आणि ‘सेकंड होम’ म्हणून ओळखली जाणारी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीच्या ८८ वर्षांच्या इतिहासातील एक सोनेरी पान शुक्रवारी लिहिले जाणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या गाडीची धुरा महिलांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. या दिवशी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या या गाडीचे चालक आणि गार्डच नव्हे, तर तिकीट तपासनिसांसह सुरक्षा आणि तांत्रिक कर्मचारीही महिलाच असणार आहेत. गाडीच्या इतिहासात महिला दिनाच्या निमित्ताने हा योग प्रथमच साधला जाणार आहे.

पुणे-मुंबई प्रवासासाठी १ जून १९३० रोजी सुरू झालेल्या डेक्कन क्वीनची लिम्का बुकमध्ये नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे तिला ‘आयएसओ’ हे गुणवत्तेचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. पुणे- मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणारे नोकरदार, व्यापारी, वकील, मंत्रालयीन अधिकारी आदींमध्ये ही गाडी प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. १ जूनला रेल्वे प्रवासी ग्रुपसह प्रवाशांच्या वतीने गाडीचा दरवर्षी न चुकता वाढदिवस साजरा केला जातो. या गाडीची डायनिंग कारही तितकीच लोकप्रिय आहे. अशा या लाडक्या गाडीच्या इतिहासात महिला दिनाला आणखी भर पडणार आहे. शुक्रवारी मुंबईहून संध्याकाळी ५.१० वाजता सुटणाऱ्या आणि रात्री ८.२५ वाजता पुण्यात पोहोचणाऱ्या या गाडीची संपूर्ण जबाबदारी महिलांवर सोपविण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केले आहे.

सगळ्याच जबाबदाऱ्या महिलांवर..

लोकल ट्रेनच्या चालक सुरेखा यादव आणि तृष्णा जोशी या दोघी या गाडीचे सारथ्य करणार आहेत. अत्यंत महत्त्वाची गार्डची जबाबदारी श्वेता घोणे या सांभाळणार आहेत. या तिघीही मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांची जबाबदारी सांभाळतात. गाडीतील सुरक्षेची जबाबदारीही रेल्वे सुरक्षा दलातील महिला कर्मचाऱ्यांवर असणार आहे. उपनिरीक्षक कविता साहू, कर्मचारी स्मृती सिंग, ज्योती सिंग, पिंकी जट, सरिता सिंग या त्यासाठी सज्ज आहेत. शांती बाला, गीता क्रूप, मेधा पवार आदी तिकीट तपासनीस आणि वाणिज्यिक कर्मचाऱ्यांचे पथक गाडीत असेल. त्याचप्रमाणे तांत्रिक गोष्टींची जबाबदारी योगिता राणे यांच्यावर असणार आहे.