राज्यातील अनेक भागात ७ जुलै पासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतीचा विचार करता नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर येथे ऑगस्टच्या पाहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पुण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. तसेच, कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत सर्व विभागांसोबत चर्चा देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे कृषी विभागातील योजनांची आढावा बैठक राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी कृषी विभागाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.

यावेळी डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, कृत्रिम पाऊस हा ज्या ठिकाणी पाडला जाणार आहे. त्यानुसार आसपासच्या ४०० किलोमीटरच्या भागात पाऊस पडतो. त्या कृत्रिम पावसाचा फायदा राज्यातील अनेक भागातील शेतकर्‍यांना होणार असून त्यामुळे दुबार पेरणीची आवश्यकता शेतकर्‍यांना पडणार नाही. दुबार पेरण्याची आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यातील शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खत वापरण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.