प्रथमेश गोडबोले prathamesh.godbole@expressindia.com

महाविद्यालयात स्वत: तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. एकाच गटामधील सात महाविद्यालयीन मित्रमैत्रिणींनी वेगवेगळय़ा वस्तू तयार करून आणल्या होत्या. या वस्तूंची विक्रीही झाली.

त्यानंतर याच वस्तूंचा व्यवसाय सुरू केला तर.. या कल्पनेतून एकत्र येत महिमा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. पेपर क्विलिंग, फ्रीज मॅग्नेट, की-चेन, पणत्या, राख्या, थ्रीडी ओरिगामी, आइस्क्रीमच्या काडय़ांपासून पेंटिंग अशा विविध वस्तू ‘आर्टिलिसियस’ या ब्रँडने त्यांनी तयार केल्या. विशेष म्हणजे आपापले शिक्षण, नोकरी सांभाळून हे सर्व तरुण-तरुणी व्यवसाय पुढे नेत आहेत.

महिमा पाटील या मूळच्या पुण्याच्या. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून, याच शाखेतील पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षांत त्या शिक्षण घेत आहेत. तसेच एका सीए फर्ममध्ये नोकरीदेखील करत आहेत. महिमा यांच्याबरोबर श्रिया सराफ, हृषीकेश टेंबे, हर्षांली सोलापूरकर, शांभवी स्वामी, प्रणव आपटे आणि श्रद्धा गोडबोले हे त्यांचे सहकारी आहेत. ग्रुपमधील प्रत्येक जण आपापल्या छंदानुसार काहीतरी वस्तू तयार करायचे. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन व्यवसाय करावा, अशी कल्पना सर्वानुमते आली आणि त्याला जानेवारी २०१७ मध्ये मूर्त स्वरूप दिले गेले. व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्या उत्पादनाची विक्री कुठे आणि कोणाला करायची, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. कारण व्यवसाय करण्याचा कोणताही अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता, परंतु सुरुवातीला नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापर्यंत उत्पादने आणि व्यवसायाची कल्पना पोहोचवली. मग ओळखीच्या लोकांकडून उत्पादनांना मागणी येऊ लागली.

‘ग्रुपमधील आम्ही मित्र-मैत्रिणी गरवारे महाविद्यालयात शिकणारे. त्यामुळे महाविद्यालयातच आम्हा सर्वाची ओळख झाली. महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते आणि त्यामध्ये आपल्या उत्पादनांची विक्रीदेखील केली जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांना विपणन, वितरण यांसह आपले छंद जोपासता यावेत. पदवीचे शिक्षण घेत असताना अशा प्रदर्शनांमध्ये आम्ही भाग घेत असू. तसेच २०१६ मध्ये या सर्वानी एकत्र येत महिमा यांच्या घरीच एक प्रदर्शन भरवले होते. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा प्रदर्शनातील विक्रीमधूनच सर्वानी एकत्र येत व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. व्यवसाय सुरू करण्याआधी आम्ही तयार करतो, तशाच प्रकारच्या उत्पादनांच्या प्रदर्शनात जाऊन उत्पादनांची माहिती घेतली. बाजारपेठेचा अभ्यास केला. ग्राहकांना नेमकी कशा प्रकारची उत्पादने लागतात याचा अभ्यास केला आणि आपली उत्पादने वेगळी कशी असतील, याकडे लक्ष दिले’, असे महिमा सांगतात.

सर्जनशील आणि कलात्मक नाव देण्याच्या विचारातून ‘आर्टिलिसियस’ हे नाव ग्रुपला दिले आहे. श्रिया सध्या फ्रेंच भाषा शिकत आहेत. हृषीकेश वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेत असून सनदी लेखापाल होण्यासाठी तयारी करत आहेत. हर्षांलीदेखील वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. शांभवी आणि प्रणव वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. श्रद्धा कला शाखा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. महिमा आणि श्रिया या दोघी पेपर क्विलिंग करतात. त्याअंतर्गत विविध प्रकारचे दागिने, की-चेन, फ्रीज मॅग्नेट आणि पणत्या तयार करतात. हृषीकेश हा थ्रीडी ओरिगामीच्या माध्यमातून शोपीस, विविध आकारांचे प्राणी व पक्षी, फ्रीज मॅग्नेट आणि की-चेन करतो. शांभवी आणि प्रणव विविध प्रकारच्या डायऱ्या तयार करतात. श्रद्धा या संपूर्ण व्यवसायाचे व्यवस्थापन पाहतात. तर, हर्षांली या आइस्क्रीमच्या काडय़ांपासून फोटोफ्रेम, पेंटिंग, वॉल हँगिंग अशी विविध उत्पादने तयार करतात. या सर्वानी कामांची वाटणी आपल्या छंद व आवडीनुसार स्वत:हून केली आहे. पेपर क्विलिंग प्रकारात गळय़ातले व कानातले अशा दागिन्यांचा सेट, कीचेन, फ्रीज मॅग्नेट अशी उत्पादने असून त्यांच्या किमती दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत आहेत. डायरीमध्ये कोऱ्या कागदाच्या डायऱ्या, डायरीच्या कव्हरवर डुडल आर्ट, बारीक नक्षीकाम, कार्टून कॅरेक्टर व अभिनेते, अभिनेत्री यांची स्केचेस, चित्रपटांमधील गाजलेले संवाद असे विविध प्रकार आहेत. तसेच वहय़ांमधील कोऱ्या राहिलेल्या कागदांची डायरीही तयार करून दिली जाते. पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत डायऱ्यांची किंमत आहे. पॉप्सिकल आर्टमध्ये फोटोफ्रेम, पेंट केलेली फ्रेम किंवा वॉल हँगिंग असून त्यांची किंमत पन्नास रुपयांपासून आहे. थ्रीडी ओरिगामीमध्ये मोर, पोपट यांसह विविध पक्षी, टेडीबिअर, मासा, सांताक्लॉज अशी उत्पादने आहेत. तसेच राखी पौर्णिमेला कागदापासून बनवलेल्या राख्या आणि दिवाळीमध्ये पणत्यांचीही विक्री केली जाते. मातीच्या पणत्या विकत आणून त्यांना विविध रंग देणे, भेट द्यायच्या असल्यास त्यानुसार आकर्षक पद्धतीने तयार करून दिल्या जातात. आर्टिलिसियस ग्रुपकडून आतापर्यंत गरवारे महाविद्यालयात दोन वेळा, डी. पी. रस्त्यावरील सिद्धी लॉन्स आणि तंबू मार्केट अशा विविध ठिकाणी प्रदर्शन भरवले आहे.

‘पेपर क्विलिंग प्रकारातील कागदाचे दागिने हा पूर्णपणे नवीन प्रकार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे दागिने टिकतील का, असा प्रश्न अनेकांना पडायचा. मात्र, या सर्व दागिन्यांना शायनिंग कोट लावत असल्याने त्यांच्या दर्जात काही फरक पडत नाही. उत्पादनांचा प्रचार, प्रसार कसा करायचा, असाही प्रश्न होता. सर्वच जण शिकत असल्याने फार भांडवल नव्हते. त्यामुळे आपापल्या घरापासून, नातेवाईक, मित्रमंडळी यांपासून सुरुवात केली आणि उत्पादनांची गुणवत्ता पाहून त्यांच्या ओळखीतून मागणी वाढत गेली. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सअ‍ॅप अशा विविध समाज माध्यमांतूनही उत्पादनांची जाहिरात केली. अनेक वेळा ग्राहकांकडूनही विशिष्ट प्रकारची कीचेन, डायरी, शोपीस, थ्रीडी ओरिगामी तयार करून देऊ शकाल का, अशी मागणी झाली. या माध्यमातूनही काळानुरूप उत्पादनांमध्ये बदल होत गेले आहेत. सद्य:स्थितीत पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित जिल्हय़ासह मुंबईतूनही मोठय़ा प्रमाणात उत्पादनांना मागणी आहे. मागणी येईल त्यानुसार उत्पादने तयार करून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात. तसेच हा व्यवसाय आणखी विस्तारण्याचा आम्हा सर्वाचा मानस आहे’, असेही महिमा सांगतात.