मिलिंद मुळीक (प्रसिद्ध चित्रकार)

विक्रम वेताळसारख्या चांगल्या मराठी कॉमिक्सपासून ते टिन्टिन् आणि अ‍ॅथ्रेटिक्ससारख्या इंग्रजी साहित्यकृतीपर्यंत नानाविध कॉमिक्स लहानपणी माझ्या वाचनात आली. माझे वडील कॉमिक्स करीत असल्याने आमच्या घरामध्ये विविध पुस्तकांचा मोठा संग्रह होता. लहानपणी ही कॉमिक्स वाचताना ताजमहालपेक्षाही ही पुस्तके मोठे आश्चर्य आहेत, असे नेहमी मला वाटे. शालेय शिक्षण सुरू असताना दि आर्टस्टि हे इंग्लंडमध्ये प्रसिद्ध होणारे मासिक हातात पडले आणि चित्रकलेविषयी माझी जवळीक वाढू लागली. चित्रकलेविषयीची पुस्तके वाचण्याची इयत्ता आठवीमध्ये असतानाच खरी सुरुवात झाली. चित्रकला, पेंटिंग आणि मॉडर्न आर्टविषयीच्या वाचनासोबतच द. मा. मिरासदार, रत्नाकर मतकरी आणि पु. ल. देशपांडे यांची पुस्तके आम्ही वाचत असू. अभ्यास, करमणूक आणि व्यक्तिमत्त्व विकास या गोष्टी वाचनातून साध्य झाल्या आणि मी संपूर्ण आयुष्यात विविध रंगांसोबत चित्ररुपी वाचनप्रवास करू शकलो.

आमच्या ओळखीचे थत्तेकाका हे शास्त्रज्ञ होते. मी शाळेत शिकत असताना त्यांनी १९६० ते १९७० या काळातील दि आर्टस्टि मासिकाच्या दहा वर्षांतील १२० प्रती आणून दिल्या. कलेला वाहून घेतलेली ही पुस्तके असल्याने त्या पुस्तकांशी माझी जवळीक वाढली. करमणूकप्रधान वाचनासोबतच चित्रकलेविषयी अभ्यासपूर्ण वाचन करण्याकरिता मला ही मासिके सहज उपलब्ध झाल्यामुळे माझा कलेविषयीचा दृष्टिकोन बदलला. दहावीनंतर माझी इंग्रजी पुस्तके वाचनाची आवड वाढू लागली. त्यामुळे ‘रेनमेकर’, ‘फाऊंटन हेड’, ‘इल्युजन’, ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ या पुस्तकांसोबत जेफ्री आर्चर यांच्या कथाही वाचू लागलो. तर विज्ञानविषयक फाऊंडेशन ही पाच पुस्तकांची मालिका मी सलग आठ महिने वाचत होतो. त्यावर्षी मला दुसरे कोणतेही पुस्तक हातात घेण्याची इच्छा झालीच नाही. दरम्यान, हॅरी पॉटरची मालिकाही मला जास्त भावली.

चित्रकलेविषयीचे इंग्रजी मासिक माझ्या वाचनात आल्यानंतर मी त्यासंदर्भात आणखी पुस्तकांचा शोध घेतला. परंतु तसे साहित्य मला मराठी भाषेत मिळाले नाही. त्यामुळे आमच्या ओळखीचे जे परदेशामध्ये जात, त्यांच्याकडून मला चित्रकलेविषयी पुस्तके मिळत होती. वाचन हे अभ्यासाप्रमाणेच करमणूक म्हणूनदेखील असावे, असे मला वाटायचे. त्यामुळे तरुण वयात ओशो रजनीश यांची अनेक पुस्तके मी वाचून काढली, तर लहानपणी नारायण धारप यांच्या ५० ते ६० पुस्तकांचे अक्षरश: पारायण केले.

नारायण धारप हे माझ्या आवडत्या लेखकांपकी एक. त्यासोबतच व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी यांची पुस्तकेदेखील माझ्या संग्रहामध्ये आहेत. हाँगकाँग लेन, पॉप्युलर बुक स्टॉल, मॅनिझ अशी पुस्तके खरेदी करण्याची पुण्यातील माझी आवडती ठिकाणे, तर मुंबईमध्ये स्ट्रँड बुक स्टॉलमध्ये चित्रकलेविषयीची पुस्तके घेण्यासाठी मी आवर्जून जात असे.

चित्रकलेशी माझा संबंध दृढ होत असताना मला ज्या अडचणी आल्या, त्या पुढील पिढीला येऊ नयेत असे मला नेहमी वाटे. त्यामुळे जलरंगावरील ‘वॉटरकलर’ हे चित्रकलेविषयीचे पुस्तक मी मराठी भाषेतून लिहिले. त्यानंतर एकामागे एक अशा ११ पुस्तकांचे लेखन माझ्या हातून झाले. त्यामध्ये ‘वाराणसी’, ‘बनारस’, ‘अ‍ॅट होम’, ‘निर्सगरंग’ अशा कलात्मक पुस्तकांचा समावेश आहे. पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रकलेचे तंत्र समजावे, हा यामागचा उद्देश होता. पेंटिंग करताना काही पुस्तकांचे मुखपृष्ठ करण्याची संधी मला लाभली. माझ्या जवळच्या नातेवाईकांकरिता ‘घर िभती’ या पुस्तकासह आनंद मासिक, काटेसावर या पुस्तकांचे मुखपृष्ठ मी केले.   कोकणातील बराचसा परिसर, हंपी, वेरुळ लेणी यासारख्या भारतातील नयनरम्य ठिकाणांपासून इटली, बेल्जियम, फ्रान्स या युरोपमधील देशांमध्ये चित्रकलेच्या निमित्ताने जाणे झाले. त्या ठिकाणासंबंधीचा इतिहास आधी पुस्तकांतून जाणून घेण्यापेक्षा दृश्य अनुभव घेत तेथे मला काय दिसले, हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला. त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर त्याविषयीची पुस्तके मी वाचत असे. पुस्तके प्रत्यक्ष हातात घेऊन वाचण्याप्रमाणेच ऑडिओ बुक्सदेखील मला आवडतात. त्यामुळे अनेकदा ऑडिओ बुक्सचा अनुभवही मी घेतला.

चित्रकलेची अथवा इतर विषयांची पुस्तके खरेदी करण्यासाठी दुकानांपेक्षा आता अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाईन साधनांचा मला जास्त उपयोग होतो. त्यामुळे माझ्या बुकशेल्फमध्ये ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेल्या पुस्तकांची संख्या मोठी आहे. वाचन प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्त्व घडविण्याकरिता उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण विविध विषयांचे वाचन करायला हवे.