पुणे महापालिकेच्या दोन प्रभागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर आणि फारुक इनामदार विजयी झाले. यातील एक जागा काँग्रेसकडे होती तर एक जागा शिवसेनेकडे होती.
प्रभाग क्रमांक २६ मधील ब या जागेवर मानकर काँग्रेसतर्फे निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. ही निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मानकर यांनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली. त्यांना ५,६१० मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे दिलीप उंबरकर यांना २,५५६ मते मिळाली. शिवसेनेचे किशोर सोनार यांना १,७५९ मते मिळाली. काँग्रेसचे माऊली राऊत यांना ८५६, मनसेचे गणेश शिंदे यांना ९३७,अपक्ष राहुल वांजळे यांना ३३७ आणि विजय झोरे यांना ११९ मते मिळाली. प्रभागात ११५ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.
शिवसेनेचे प्रमोद उर्फ नाना भानगिरे प्रभाग क्रमांक ४५ मधील अ जागेवरून महापालिकेत निवडून आले होते. त्यांनी हडपसर  मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे फारुक इनामदार ९,२५२ मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे जयसिंग भानगिरे यांना ६,८६५, काँग्रेसचे वैभव डांगमाळी यांना ७४८, अपक्ष उमेदवार संजय घुले यांना ५,०४१ आणि जीवन जाधव यांना ३,०२४ मते मिळाली. या प्रभागात १३९ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.

 पिंपरीत शिवसेनेला धक्का
  शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पिंपरी महापालिकेच्या जिजामाता प्रभागातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण टाक विजयी झाले. भाजप तसेच राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांशी ‘फिक्सिंग’ होऊनही शिवसेनेचे उमेदवार व आमदारबंधू सुनील चाबुकस्वार यांना निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विधानसभेपाठोपाठ पोटनिवडणुकीतही रिपाइंच्या उमेदवाराला निवडून आणण्यात भाजपला अपयश आले. वाल्मीकी समाजाची एकगठ्ठा मते, भाजप-सेनेतील मतांची विभागणी, अत्यल्प मतदान आणि शेवटच्या टप्प्यातील पैशाचा धूर या गोष्टी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्या.
राष्ट्रवादीचे अरुण टाक यांनी ४७८ मतांनी बाजी मारली आणि शिवसेना व भाजपलाही जोरदार धक्का बसला. टाक यांना सर्वाधिक २,५९३ मते मिळाली. रिपाइं-भाजप युतीचे अर्जुन कदम २,११५, शिवसेनेचे उमेदवार व विजयाचे प्रबळ दावेदार चाबुकस्वार यांना १,८२९ मते मिळाली. काँग्रेसचे संपत ओव्हाळ यांना २९७, अजय लोंढे यांना ९२ तर राजू भालेराव यांना ५४ मते मिळाली. नकाराधिकाराचा वापर १३२ मतदारांनी केला.
भावाला निवडून आणण्यासाठी आमदार चाबुकस्वारांची प्रतिष्ठा लागली होती. सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य घेत विधानसभेची निवडणूकजिंकणाऱ्या चाबुकस्वारांनी याही वेळी त्यांचा ‘फॉम्र्युला’ ठेवला होता. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराऐवजी आमदारबंधू म्हणूनच सुनील चाबुकस्वारांचा प्रचार होत होता आणि राष्ट्रवादी तसेच भाजपच्या बडय़ा नेत्यांचे ‘फिक्सिंग’ही झाल्याची चर्चा होती. याउलट, टाक यांचे बनावट जातीचा दाखला प्रकरण राष्ट्रवादीला अडचणीचे ठरले होते. राष्ट्रवादीतील नेत्यांची तीव्र गटबाजी होती. अनेकदा मागणी करूनही अजित पवार यांची सभा मिळाली नाही. याउलट, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सभेने रिपाइं उमेदवारासाठी वातावरणनिर्मिती झाली होती. टाक यांना समाजाची एकगठ्ठा मते मिळाली. भाजपचा उमेदवार िरगणात नसल्याने सिंधी समाजाचे मतदार बाहेर पडले नाहीत. काँग्रेस उमेदवार अतिशय कमकुवत ठरला. भाजप-सेनेतील मतांची विभागणी झाली. पर्यायाने राष्ट्रवादीला फायदा झाला आणि उमेदवाराचे प्रचाराचे नियोजनही निर्णायक ठरले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या राष्ट्रवादीला टाक यांच्या विजयाने आगामी पालिका निवडणुकीसाठी चांगलाच दिलासा मिळाला आहे.