नाटय़ परिषदेच्या पिंपरी शाखेच्या वतीने दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायक व संगीतकार हरिहरन यांना जाहीर झाला आहे. एक लाख ११ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून २९ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवड-भोईरनगर येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार लक्ष्मण जगताप या वेळी उपस्थित राहणार आहेत. हरिहरन यांच्या गीतांवर आधारित ‘रजनीगंधा’ कार्यक्रम या वेळी होणार असून त्यात धवल चांदवडकर, प्रियांका बर्वे, रूपाली घोगरे, सायली सांभारे, मधुसुदन ओझा हे गायक सहभागी होणार आहेत. संगीतक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संगीतकारास ‘आशा भोसले पुरस्कार’ देण्यात येतो. आतापर्यंत लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, बाप्पी लहिरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अन्नु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 3:00 am