इंग्रजांच्या राजवटीत नव्हती एवढी देशाची वाईट अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेरगाव येथे काँग्रेस मेळाव्यात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नुसतेच परदेश दौरे सुरू आहेत. त्यातून महाराष्ट्र हिताचे निर्णय होत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शहर काँग्रेसच्या ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रमाचे उद्घाटन चव्हाणांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, उल्हास पवार, शरद रणपिसे, प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, शहराध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते. शहर काँग्रेसच्या वतीने एक लाख रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात आला.
चव्हाण म्हणाले, ‘अच्छे दिन’ येणार म्हणणाऱ्या भाजपने आम्ही असे म्हटलोच नाही म्हणत घुमजाव केले आहे. खोटी आश्वासने देऊन भाजपने मते घेतली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्यांचे कर्ज माफ केलेच पाहिजे. साखर कारखानदारी संकटात आहे. औद्योगिक क्षेत्रात तंटे सुरू आहेत. महाराष्ट्रातील वातावरण कलुषित असून सरकारने सामाजिक संघर्ष निर्माण केले आहेत. पहिल्या क्रमांकावरील महाराष्ट्र आठव्या स्थानावर फेकला गेला आहे. उद्योग क्षेत्राचा ऱ्हास सुरू आहे. सरकारने झोपेचे सोंग घेतले असून त्यांना उठवणे अवघड आहे. राज्यघटना सुरक्षित राहिलेली नाही. सरकारच्या विरोधात बोलल्यास तो देशद्रोह ठरवला जाणार आहे. इंग्रजांच्या काळात नव्हती एवढी वाईट अवस्था मोदींच्या काळात आहे. काँग्रेस हे लाड चालू देणार नाही. यश-अपयशाची चिंता न करता भरपूर काम करू आणि काँग्रेसचे गतवैभव मिळवून देऊ. उणिवा दूर करा आणि काँग्रेसची ताकद वाढवा म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकेल. काँग्रेसने ‘जेएनयू’अंतर्गत शहरांना भरपूर निधी दिला. त्यामुळे शहरांचा विकास झाला. भाजपने मात्र गुणवत्ता असूनही िपपरी-चिंचवडवर अन्याय केला. प्रास्ताविक सचिन साठे यांनी केले. नरेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. चिंतामणी सोंडकर यांनी आभार मानले.