02 March 2021

News Flash

 ‘काही वैचारिक ऐकावे अशी शहरी लोकांची मानसिकता नाही’

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात नायगावकर बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात खुमासदार शैलीने अशोक नायगावकर यांनी बुधवारी रसिकांना खळखळून हसविले. प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

एका बाजूला ग्रामीण भागात संस्कृती जपणारी माणसे आहेत तर दुसरीकडे शहरातील लोकांना त्याचे काहीच पडलेले नाही. बौद्धिक किंवा वैचारिक असे काही ऐकावे, अशी शहरी लोकांची मानसिकताच राहिलेली नाही. तरुण उच्चशिक्षण घेऊन सुशिक्षित होत आहेत, परंतु त्यांच्यातील सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. अशाप्रकारे शहरीकरणाचे दोष समोर येत असून शहरी समाजाची वाटचाल एका पिढीबरोबर सांस्कृतिक अस्ताकडे जात असल्याची खंत, प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी बुधवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात नायगावकर बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भोपाळ दुर्घटनेवरील डोळ्यात अंजन घालणारी कविता, पु. ल. देशपांडे यांचे किस्से याबरोबरच जन्मगाव वाईपासून मुंबईतील बँकेतील नोकरी आणि कवितेच्या कार्यक्रमापासून ते कौटुंबिक कारणास्तव लंडनमध्ये होणाऱ्या वास्तव्यापर्यंतचा प्रवास नायगावकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत कथन केला.

वाई हे उत्सवप्रिय गाव. तेथील संस्कार आणि पाचवीत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नाना पाटील, र. गो. सरदेसाई, प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषणांमुळे कवितेची वाट धरली, असे सांगून नायगावकर म्हणाले,की पुणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील रसिक चोखंदळ असून ग्रामीण भागासह परदेशातील मराठीजन सांस्कृतिक कार्यक्रमांना भुकेले असतात. ग्रामीण भागातील अनेक लोक येऊन कवितांचे कार्यक्रम ठेवण्याचा आग्रह करतात आणि चार-पाच तास एका जागेवर बसून श्रवणभक्तीत रममाण होतात. पुण्यातील गांधीभवन येथील कार्यक्रमानंतर रात्री अडीच वाजता एका महिलेने गरम पोळ्या आणि कोबीच्या भाजीचा डबा खास माझ्यासाठी आणला होता, अशा पद्धतीने रसिक प्रेक्षकांनी सांस्कृतिकता जिवंत ठेवली असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यमापनात याला स्थान देणार की नाही?

कविता कार्यक्रमांच्या निमित्ताने कवी मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि आता जगभर फिरत असतात. राजकारणी जेवढी गावे फिरत नाहीत त्या ठिकाणी कवी जाऊन आलेले असतात. महाराष्ट्रातील अनेक गावे कवितेला अक्षरश: वाहिलेली आहेत. अनेक लहान-लहान गावातील शिक्षक मनापासून विद्यार्थ्यांना कथा, कविता शिकवतात, अशा पद्धतीने सांस्कृतिक क्षेत्राने महाराष्ट्र टिकवून ठेवला आहे राजकारण्यांनी नव्हे, असेही ते म्हणाले. सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक आणि वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 1:03 am

Web Title: ashok naigaonkar talk in masap gappa of maharashtra sahitya parishad
Next Stories
1 ‘एटीएम’मध्ये पुन्हा खडखडाट;रक्कम काढण्यावरही अघोषित मर्यादा
2 नैदानिक चाचण्यांच्या आयोजनात सरकारी ढिसाळपणा
3 पिंपरीतील बिर्ला रुग्णालयातील ३५० कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
Just Now!
X