संगीत, नाटय़, नृत्य या प्रयोग कलांचा अभ्यास करणाऱ्या संशोधक आणि कलाकारांसाठी पुण्यामध्ये ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज’ हे संग्रहालय आणि ग्रंथालय कार्यान्वित होत आहे. ज्येष्ठ संगीत समीक्षक डॉ. अशोक दा. रानडे यांच्या संग्रहातील सांस्कृतिक ठेवा रानडे कुटुंबीयांनी महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडे सुपूर्द केला असून संस्थेने हे अर्काइव्हज साकारले आहे.
हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे दोन खोल्यांमध्ये साकारण्यात आलेल्या या अर्काइव्हजचे उद्घाटन शुक्रवारी (३१ ऑक्टोबर)प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होणार आहे. राजहंस प्रकाशनतर्फे डॉ. रानडे यांच्या ‘संगीत संगती’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या हस्ते होणार आहे. उत्तरार्धात ‘डॉ. अशोक दा. रानडे : कलाविषयक कार्य’ हा कार्यक्रम डॉ. सुरेश चांदवणकर सादर करणार असून प्रसिद्ध हार्मोनिअमवादक चैतन्य कुंटे संग्रहकक्षातील संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी दामले आणि उपाध्यक्ष प्रमोद काळे यांनी दिली.
या अर्काइव्हजमध्ये रानडे यांच्या संग्रहातील संगीतशास्त्र, बंदिशी, कलाकारांची चरित्रे-आत्मचरित्रे, आवाज साधना, नाटय़संहिता अशा वेगवेगळ्या विषयांवरील मराठी, हिंदीी, इंग्रजी, बंगाली, जर्मन आणि फ्रेंच भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. तर, प्रयोग कलांविषयक हस्तलिखिते आणि एक हजारांहून अधिक तासांचे ध्वनिमुद्रण सीडी आणि डीव्हीडी माध्यमामध्ये उपलब्ध आहे. संगीत अभ्यासक आणि कलाकारांना दर सोमवारी आणि बुधवारी दुपारी चार ते आठ या वेळात अल्प मासिक शुल्कामध्ये वाचनासाठी किंवा संगीत श्रवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रयोग आणि शास्त्र या दोन्ही परंपरांचा संगम घडवून आणावा हाच या अर्काइव्हजचा उद्देश आहे, अशी माहिती चैतन्य कुंटे यांनी दिली.