अशोक सराफ यांची भावना

माझ्या विनोद सादरीकरणाच्या जडणघडणीत पुलंच्या साहित्यकृतींचा मोठा वाटा आहे. त्यांची अनेक पुस्तके माझ्या घरी आहेत. पुलंचा विनोद हा केवळ शाब्दिक नाही, तर तो ‘बिटवीन द लाईन्स’ आहे. पुलं हे माझे दैवत असून त्यांचे साहित्य म्हणजे संजीवनी आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी रविवारी व्यक्त केली.

‘पु. ल. परिवार’आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे आयोजित ‘पुलोत्सवा’त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित पुलंच्या चित्रपटांचा महोत्सव आणि पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन सराफ यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.

सराफ म्हणाले,‘ पुलं आणि लता मंगेशकर ही महाराष्ट्राची दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत. पुलंच्या विनोदात प्रत्येक वेळी नवीन अर्थ गवसतात. सध्याच्या काळातील विनोद सादरीकरणाची पद्धत अंगावर काटा आणणारी आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आणि नव्याने येणाऱ्या कलाकारांनी पुलंच्या बहुआयामी विनोदी शैलीचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या पुस्तकांच्या वाचनाची पारायणे केली पाहिजेत.’