‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग’ (एएसआरटीयू) या देशातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या शिखर संस्थेचे विविध पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात सर्वात कमी चालनीय खर्चात गाडय़ा चालविण्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आला.
एसटीचे सन २०११-१२ या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामीण सेवा वर्गामध्ये २३.६३ रुपये प्रती किलोमीटर, असा सर्वात कमी चालनीय खर्च नोंदविला. इतर परिवहन महामंडळाच्या तुलनेमध्ये हा सर्वात कमी खर्च असल्याने एसटीला त्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. चषक व पन्नास हजार रुपयांचा धनादेश, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राजस्थानातील जोधपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे यांना केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाचे सहसचिव संजय बंडोपाध्याय व बेस्टचे महाव्यवस्थापक ओम प्रकाश गुप्ता यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.