शिवाजीनगर येथील जागेत महामेट्रोचे स्थानक प्रस्तावित

शिवाजीनगर येथील धान्य गोदामांच्या जागेत महामेट्रोचे मुख्य स्थानक प्रस्तावित आहे. त्यासाठी संबंधित जागेतील धान्य गोदाम, सेतू सेवा केंद्र, निवडणूक आणि पुरवठा विभागाची गोदामे अन्यत्र हलविण्यात येणार आहेत. फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एफसीआय), शासकीय दूध योजना या जागांनंतर आता जुन्या जिल्हा परिषदेत धान्य गोदाम स्थलांतरित करण्याबाबत चाचपणी घेण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय धान्य गोदामाच्या जागेची मागणी महामेट्रोकडून (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन) राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्याला मान्यताही प्राप्त झाली आहे. परंतु, धान्य गोदामे स्थलांतर करण्यासाठी अद्यापही पर्यायी जागा निश्चित करण्यात आलेली नाही. मागील वर्षी पहिल्यांदा एफसीआयच्या जागेत गोदामे स्थलांतर करण्यात येणार होती. परंतु, एफसीआय प्रशासनाने त्याला नकार दिला.

शासकीय दूध योजनेच्या जागेचे भाडे परवडत नसल्याची सबब महामेट्रोकडून देण्यात आल्याने या जागेचा पर्यायही निकाली निघाला. त्यानंतर आता जुन्या जिल्हा परिषदेत तळमजला आणि पहिल्या मजल्यावर गोदामांसाठी जागा देण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, धान्य गोदामांच्या परिसरात झोपडपट्टी असून मेट्रोच्या स्थानकामुळे अडीचशे झोपडय़ा बाधित होत आहेत. मात्र, त्यांना आता लगेच पर्यायी जागा उपलब्ध करून देता येणार नसून शेवटच्या टप्प्यात हा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

पर्यायी जागेचा शोध

मेट्रोच्या तिन्ही मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. त्यासाठी धान्य गोदामांच्या जागेत स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. धान्य गोदामासाठी पर्यायी जागा शोधण्याचे प्रयत्न गेल्या वर्षीपासून सुरू आहेत. या पर्यायी जागेचा वापर साखर, तूरडाळ आणि कारवाईत जप्त केलेले सुमारे दोन हजार मेट्रिक टन धान्य ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे.

म्हणून जुन्या जागेचा विचार

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत झाल्यानंतर जुन्या जिल्हा परिषदेतील जिल्हा प्रशासनाची कार्यालये नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे जुन्या जिल्हा परिषदेत जागा रिकामी आहे. तसेच हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने सोयीचे आहे. शहर अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली असून त्यांनी या जागेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर या जागेबाबत बोलणी सुरू करण्यात आली आहेत. महामेट्रोने जुन्या जिल्हा परिषदेच्या जागेचे भाडे देण्याबाबत हिरवा कंदील दाखवल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित जागा धान्य गोदामांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.