News Flash

सद्य:स्थितीत बालकांची भावनिक साक्षरता महत्त्वाची!

डॉ. केळकर म्हणाले, ‘‘करोना काळात एकाकीपणा वाढला आहे

डॉ. संदीप केळकर यांचा पालकांशी संवाद

पुणे : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पालकांना कधी नव्हे एवढा काळ घरामध्ये मुलांबरोबर मिळत आहे. अनिश्चितता, चिंता, काळजी, घालमेल, एकाकीपणा, कंटाळा अशा विविध प्रकारच्या भावनांना सामोरे जात मुलांचे व कुटुंबाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. मुलांना भावनिक साक्षर करण्यासाठी करोनाकाळ महत्त्वाचा आहे, याकडे लक्ष वेधत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी शनिवारी पालकांशी संवाद साधला.

‘लोकसत्ता मधली सुट्टी’ उपक्रमात ‘करोना काळातील पालकत्व’ या विषयावर डॉ. केळकर यांनी मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी स्वाती पंडित यांनी सूत्रसंचालन केले आणि श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेत डॉ. केळकर यांच्याशी संवाद साधला.

डॉ. केळकर म्हणाले, ‘‘करोना काळात एकाकीपणा वाढला आहे. अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाले आहेत. अनेकदा भावनेच्या भरात काही गोष्टी पालकांच्या हातून होण्याची शक्यता असते. तसेच मुलांमध्ये आणि तरुणांच्या बाबतीतही घडू शकते. त्यामुळे भावनासाक्षर असणे गरजेचे आहे.’’

तीव्र भावना नियंत्रणात ठेवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे भावना ओळखणे. भावना स्वीकारून भावनेला वैधता देणे, ही भावना का आली याचा शोध घेण्यासाठी भावनिक आत्मभान असणे, त्या भावनेकडे स्थायी पद्धतीने पाहणे याचे तंत्र आत्मसात करून मुलांनाही शिकवून पालक त्यांना भावनासाक्षर करू शकतात. अनेकदा मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते. पण पालकांनी मुलांच्या भावनांचे प्रशिक्षक व्हायला हवे. मुलांमध्ये भावना निर्माण होण्याचा दोष जन्मजात नसतो. त्यामुळे घाबरू नको असा संदेश देण्यापेक्षा भावनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ. केळकर म्हणाले, ‘‘पौगंडावस्थेतील मुलांना सांगण्यापेक्षा पालकांनी त्यांचे ऐकणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या म्हणण्याबाबत लगेच चूक-बरोबर करणे योग्य नाही. कुटुंबातील सर्वांनी मिळून काही वेळ एकत्र येत आपसात संवाद करणे गरजेचे आहे. लहान मुलांनाही जास्त सांगण्यापेक्षा त्यांना विचारायला हवे. जेणेकरून मुले स्वत: विचार करू लागतील. वेगवेगळ्या पर्यायांचे परिणाम काय होतील हे त्यांना समजू लागेल. त्यातून मुले स्वतंत्रही होतील. मुलांना त्यांच्यातील नकारात्मक भावनांना सामोरे जाऊ  द्यावे. मुलांना नाही म्हणायलाही शिका. पण नाही म्हणण्याचेही कौशल्य पालकांनी शिकून घ्यायला हवे. नाही म्हटल्याशिवाय मुलांमधील आवेगावर नियंत्रण आणता येणार नाही. वाढत्या वयानुसार मुलांमध्ये एकाग्रता येणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात एकाग्रता अवघड झाली आहे. एकाग्रता नसल्याने चंचलता येते. पण त्यातूनही मार्ग काढता येतो.

शिस्त लावण्यासाठी मुलांना ओरडणे, फटका देणे ही पालकांची शस्त्रे निरुपयोगी आहेत. त्याऐवजी वेगळ्या पर्यायांसाठी पालकांनी कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. शारीर भाषा, नेत्रसंपर्क, शब्दांचा वापर आणि बोलण्याचा सूर या सर्व गोष्टी योग्य असल्यास मुलांना योग्यरीत्या समजते. ऑनलाइन शिक्षण स्मार्टफोनपेक्षा लॅपटॉप किंवा मोठ्या पडद्यावरील साधनांवर भर देण्याचा प्रयत्न करावा,’’ असे केळकर यांनी सांगितले.

करोनाविषयक घ्यावयाची काळजी

करोनाविषयी मुलांशी बोलताना त्यांच्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायला हवे, असे सांगून डॉ. संदीप केळकर म्हणाले, ‘‘मुलांमधील संसर्ग अलाक्षणिक स्वरूपाचा असून केवळ दोन टक्के मुलांमध्ये तापासारखी लक्षणे दिसतात. मुखपट्टी, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे याचे महत्त्व सांगून त्यांना वैज्ञानिक पद्धतीने माहिती देणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्तीसाठी सकस आहार महत्त्वाचा आहे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन जायचे नाही. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीची तीव्रता तीन दिवसांपेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पालकांनी वेळेतच मुलांचे लसीकरण करून घ्यावे. करोनापेक्षा अस्वस्थतेची महासाथ मोठी आहे. पालकांनी आपल्यातील भावनांचे नियंत्रण केल्यास मुलांमधील राग, अस्वस्थता, गैरवर्तणूक नियंत्रणात राहील. मुलांच्या भावनांना प्रतिक्रिया देण्यापेक्षाही प्रतिसाद द्यायला हवा.

आपण सगळ्या भाषा शिकतो. पण भावना आणि मन यांचे शिक्षण घेत नाही. ती संधी करोनाकाळाने दिली आहे. योग्य प्रकारे व्यक्त करून भावनांचे समायोजन करता आले तर कुटुंबाचे मानसिक आरोग्य सुदृढ राहू शकते. त्यामुळे पालकांची जबाबदारी मोठी आहे.              – डॉ. संदीप केळकर, बालरोगतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 1:41 am

Web Title: at present the emotional literacy of children is important akp 94
Next Stories
1 कासवांचे प्रजोत्पादन धोक्यात
2 सर्वांच्या लसीकरणाची घाई हीच चूक!
3 गवताच्या नव्या प्रजातीचा आंबोलीमध्ये शोध
Just Now!
X