30 October 2020

News Flash

शासनाच्या आदेशामुळे आराखडा मंजूर होण्याचा मार्ग मोकळा

शासनाच्या स्पष्ट आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक पाऊल मागे जावे लागले असून आराखडय़ाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादीने घेतली आहे.

स्मार्ट सिटी योजनेचा आराखडा केंद्राला पाठवण्याबाबत काय तो स्पष्ट निर्णय १४ डिसेंबपर्यंत घ्या, असा स्पष्ट आदेश राज्य शासनाने गुरुवारी महापालिकेला दिला. शासनाने अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे महापालिकेने तातडीने सोमवारी (१४ डिसेंबर) सकाळी अकरा वाजता खास सभा बोलावली असून या सभेत स्मार्ट सिटीबाबत अंतिम निर्णय होईल. दरम्यान, शासनाच्या स्पष्ट आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक पाऊल मागे जावे लागले असून आराखडय़ाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादीने घेतली आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी आराखडय़ाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव बुधवारी महापालिकेच्या खास सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने बहुमताच्या जोरावर ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलला. हा प्रस्ताव केंद्राला १५ डिसेंबपर्यंत सादर होणे आवश्यक असल्यामुळे स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुण्याचा समावेश होण्याची शक्यता मावळली होती. मात्र या निर्णयावर गुरुवारी शहरात जोरदार प्रतिक्रिया उमटली. पुण्याच्या सर्व आमदारांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. आराखडा १५ डिसेंबर पर्यंत जाणे आवश्यक असल्यामुळे योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला द्यावेत, असे पत्र आयुक्त कुणाल कुमार यांनीही राज्य शासनाच्या प्रधान सचिवांना पाठविले होते.
शासनाचा महापालिकेला आदेश
महापालिकेचा प्रस्ताव केंद्राकडे वेळेत गेला नाही, तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून शहराला वंचित राहावे लागेल. विविध अनुदानांपासून पुणे महापालिका वंचित राहिल. त्यामुळे महाराष्ट्र पालिका अधिनियमातील कलम ४४८ नुसार राज्य शासनाने स्मार्ट सिटी आराखडय़ाबाबत १४ डिसेंबपर्यंत सुस्पष्ट निर्णय घेण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. या आदेशाचे पालन केले नाही तर शासनाला कारवाई करावी लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून हा आदेश प्राप्त झाल्यानंतर लगेचच सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये या आदेशाची चर्चा सुरू झाली. पक्षाचे नेते अजित पवार यांनीही आमचा स्मार्ट सिटीला पाठिंबा आहे, असे जाहीर केले. ही वार्ता पुण्यातील पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर सोमवारच्या सभेत आराखडय़ाला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होऊन तसा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 सभेत राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार
राज्य शासनाच्या आदेशानुसार जी सभा सोमवारी बोलावण्यात आली आहे त्या सभेत महापालिकेची स्वायत्तता कायम ठेवून स्मार्ट सिटी अभियानात पुणे महापालिकेने सहभागी व्हावे, अशी उपसूचना राष्ट्रवादीकडून दिली जाईल. ही उपसूचना देऊन नंतर राष्ट्रवादी स्मार्ट सिटी आराखडय़ाला पाठिंबा देईल, अशी माहिती सभागृहनेता शंकर केमसे यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे आराखडा मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 3:35 am

Web Title: atlast ncp accepted smart city plan
Next Stories
1 पिंपरीत क्षेत्रीय सभेत महिला सभापतीला मारहाण
2 ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची शहनाईवादनाने नांदी
3 स्वदेशी बनावटीचा ऑर्गन परदेशामध्ये जाणार
Just Now!
X