पुणे जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात गेले दोन आठवडे गारांचा वर्षांव होत असताना आतापर्यंत पुणे शहर त्याला अपवाद ठरले होते. मात्र गुरुवारी पुणे शहराचा काही भाग व पिंपरी-चिंचवड परिसरात गारा पडल्याने हा अपवादही उरला नाही.
पुण्यात गुरुवारी गारा तर पडल्याच, शिवाय अनेक भागांमध्ये वादळी पावसानेही हजेरी लावली. पुणे वेधशाळेत आणि लोहगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येकी १ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पुण्यात शुक्रवारीसुद्धा वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र पावसाची शक्यता अगदीच कमी असेल, असे पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले.
आतापर्यंत पुण्याच्या आसपास वादळी पाऊस आणि गारपीट होत असताना पुणे शहरात नाममात्र पाऊस झाला होता. मात्र, गुरुवारी ही कमी भरून निघाली. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या काही भागांत गारा पडल्या. विशेषत: कात्रज-आंबेगाव परिसर, सिंहगड रस्त्यावर धायरी, पिंपरी-चिचवड परिसरात आकुर्डी, गुरव पिंपळे, दापोडी या भागात गारा पडल्या. याशिवाय इतरही भागात गारांचा सडा पडला. सामान्यत: पावसाळ्याच्या आधी म्हणजे मे महिन्यात असा वादळी पाऊस व गारा पाहायला मिळतात. पण या वेळी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हा अनुभव मिळाला.