चोरटय़ाकडून मदतीचा बहाणा

पुणे: एटीएम यंत्रातून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून चोरटय़ाने त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ज्येष्ठ नागरिकाचे डेबिट कार्ड चोरून चोरटय़ाने सराफी दुकानातून ९७ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे उघडकीस आले.

घनश्याम बाबुराव गायकवाड (वय ५९, रामटेकडी, हडपसर) यांनी या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गायकवाड लष्कर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिपाई आहेत. वेतनातून मिळालेली रक्कम त्यांनी जमा केली होती. अडचणीच्या काळात उपयोगी पडेल म्हणून त्यांनी मोठी रक्कम खात्यात ठेवली होती. तीन दिवसांपूर्वी गायकवाड रामटेकडी भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात सकाळी साडेदहाच्या सुमारास गेले. त्या वेळी गायकवाड यांना एटीएम यंत्रातून रोकड काढता आली नाही. गायकवाड यांच्या पाठोपाठ एटीएम केंद्रात एक चोरटा शिरला. त्याने गायकवाड यांना एटीएम यंत्रातून पैसे काढून देण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडील डेबिट कार्ड आणि गोपनीय शब्द चोरटय़ाने घेतले. यंत्रातून पैसे काढण्याचा बहाणा करणाऱ्या चोरटय़ाने गायकवाड यांना त्याच्याकडील डेबिट कार्ड दिले आणि तो पसार झाला.

दरम्यान, गायकवाड यांच्या डेबिट कार्डचे गोपनीय क्रमांकाचा गैरवापर करून चोरटय़ाने एका सराफी दुकानातून ९७ हजार ७०० रुपयांचे दागिने खरेदी केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. जगताप तपास करत आहेत.