भारतात अजूनही जनतेच्या विश्वासास पात्र असणारी सेवा म्हणून टपाल सेवेकडे पाहिले जाते. बँका असल्या तरी आजही पोस्टात बचत खाते असणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्या सर्वाना रांगेत उभे राहून रक्कम काढावी लागू नये यासाठी आता टपाल खातेही एटीएम सेवा पुरवण्यास सज्ज झाली आहे. त्याअंतर्गतच पुण्यात चौथ्या एटीएम केंद्राचे उद्घाटन बुधवारी होत आहे.
पुण्यात पोस्टाचे सुमारे पाच लाख खातेदार आहेत. यापूर्वी शहरात साधु वासवानी चौकातील मुख्य डाकघर, लक्ष्मी रस्त्यावरील सिटी पोस्ट व चिंचवड येथे ही एटीएम उभारण्यात आली होती, आता याच मालिकेतील चौथे एटीएम केंद्र शिवाजीनगर येथील प्रधान डाकघर येथे सुरू करण्यात येत आहे. कोअर बँकिंग सेवा पुणे विभागातील ९ मुख्य डाकघरे व ५८ उपडाकघांमध्ये सुरू करण्यात आली आहे. देशभरातील एटीएम कार्ड्स हे पोस्टाच्या एटीएम केंद्रात वापरता येणार आहेत. बँकांच्या वाढत्या स्पर्धेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भविष्यात हे एटीएम अन्य बँकांशी देखील संलग्न करण्यात येणार आहेत. सुरुवातीचे सहा महिने या एटीएमद्वारे मर्यादित सेवा दिल्या जाणार असून त्यानंतर इतर बँकांप्रमाणे सर्व सेवा सुरू करण्यात येणार आहेत. लवकरच पुणे विभागातील सातारा, कराड, सोलापूर, श्रीरामपूर, अहमदनगर, पंढरपूर व फलटण येथेही एटीएम केंद्रे सुरू करण्यात येणार असून हे वर्ष संपेपर्यंत पुणे विभागातील सर्व म्हणजे ४९७ डाकघरे कोअर बँकिंग प्रणालीद्वारे जोडली जाणार आहेत.
पोस्ट खात्याच्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरणातील पुढचे पाऊल म्हणजे एटीएम सेवा होय. या प्रकल्पांतर्गत देशातील सर्व म्हणजे एक लाख पंचावन्न हजार डाकघरे कोअर बँकिंग सेवेने जोडली जाणार आहेत. आजपर्यंत भारतात १२३ एटीएम केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यापैकी महाराष्ट्रात ११ केंद्रे आहेत.

पोस्टाच्या एटीएम केंद्रांना ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींसाठी खास प्रकारची उतरण देखील ठेवण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना देखील विनातक्रार या सेवेचा लाभ घेता येईल.