राजकीय क्षेत्रापेक्षा अधिक राजकारण संगीत क्षेत्रामध्ये असून, या क्षेत्रातील वातावरण निरोगी राहिलेले नाही. त्यातूनच अनेक चांगल्या गायकांना पुढे येता येत नाही, असे वक्तव्य प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी केले.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार’ वाडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महापौर चंचला कोद्रे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, त्याचप्रमाणे विजय राम कदम, शामलाताई गायकवाड, प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, दरोडे-जोग असोसिएटचे सुधीर दरोडे आदी त्या वेळी उपस्थित होते.
वाडकर म्हणाले की, राजकारणी मंडळी करणार नाही, इतके राजकारण संगीताच्या क्षेत्रात होते आहे. आमची मंडळी राजकारण्यांनाही राजकारण शिकवेल. या क्षेत्रातील राजकारणामुळे चांगले गाणारेही पुढे येऊ शकत नाहीत. राम भाऊंनी अनेक नव्या मुलांना गाण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. अशी माणसे आता खूप कमी झाली आहेत. त्यांच्याइतका गोड संगीतकार मी फार कमी पाहिला. ३७ वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडे पहिले गाणे गायलो.
पवार म्हणाले की, राम कदम यांनी सुमारे पाच दशके मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केले. मराठी मातीतील अनेक गीतप्रकारात चाली लावून त्यांनी ती गीते अजरामर केली. सुरेश वाडकर यांच्याविषयी ते म्हणाले की, वाडकर यांनी विविध भाषांमध्ये गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. वाडकर हे सर्वप्रथम उत्तम माणूस व स्पष्टोक्ते आहेत. स्पष्टवक्तेपणा मलाही आवडतो. त्यामुळे अनेक अडचणीही येतात, पण माणसाने त्याला चिकटून राहिले पाहिजे.
यादव म्हणाले की, कला व वास्तवात फरक आहे. कला ही वास्तव जीवनातील सौंदर्य सादर करते. चौसष्ट कलांमध्ये संगीत ही सवरेत्कृष्ट कला आहे. कलाकार आपल्या सामर्थ्यांनेच उच्च पातळीपर्यंत पोहोचतो.