News Flash

मराठा समाजाकडूनच अॅट्रॉसिटी कायद्याचा सर्वाधिक गैरवापर- आठवले

विरोधी गटाला अडचणीत आणण्यासाठी दलित समाजाच्या व्यक्तीमार्फत अ‍ॅट्रॉसिटी टाकण्याचा प्रकार होतो.

रामदास आठवले (संग्रहित छायाचित्र)

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे, असे अनेक जण म्हणत आहेत. मात्र, या कायद्याचा गैरवापर दलितांपेक्षा मराठा समाजाकडूनच सर्वाधिक होत असून याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केले. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज एकत्र येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, सत्ता जाऊन अस्वस्थ झाल्याने आता त्या समाजाचे मोर्चे सुरू झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापमध्ये ते बोलत होते. कोपर्डीतील दुर्दैवी घटना, अ‍ॅट्रॉसिटी कायदा, मराठा समाजाचे मोर्चे, कविता आदी विविध विषयांवर आठवले यांनी संवाद साधला.

आठवले म्हणाले,‘‘ आपल्याच विरोधी गटाला अडचणीत आणण्यासाठी दलित समाजाच्या व्यक्तीमार्फत अ‍ॅट्रॉसिटी टाकण्याचा प्रकार होतो. त्यामुळे या कायद्याचा गैरवापर कोण करीत आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मात्र, या घटनेचा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा संबंध नाही. या घटनेतील आरोपी दलित समाजाचे असले तरी त्यांना आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीच पोलिसांसमोर हजर केले. दलित समाज कधीही मराठा समाजाच्या विरोधात नाही. दोन्ही समाजांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, परंतु गैरवापर होत असेल तर कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यासाठी प्रयत्न करु,’’ असेही त्यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत केलेल्या विधानाबाबत ते म्हणाले,की उदयनराजे राजघराण्यातील आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे व्यक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी सर्वप्रथम मीच केली होती. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मराठाच काय, ब्राह्मण, लिंगायत अशा सर्व जातींना २५ टक्के आरक्षण मिळायला हवे, त्यासाठी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. वार्तालाप कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कुटे उपस्थित होते.

दलितांवर अत्याचार राजकीय पक्षांमुळे नव्हे तर लोकांच्या मनातील जातीयवादी विचारांमुळे होतात. समाजातील दरी कमी करणे गरजेचे असून आंतरजातीय विवाहांमुळे ही दरी कमी करता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मी या मुद्यांवर एकत्र आलो तर नक्कीच लोकांच्या विचारांमध्ये बदल होऊन समाजात शांतता नांदेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 4:31 am

Web Title: atrocity law most misuse by maratha community say ramdas athawale
Next Stories
1 बेघर, बेवारसांसाठी मानवतावादी दृष्टिकोनातून काम
2 मुलांसमवेत रमणारे योगेश मालखरे अपघातात जखमी झालेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीचा मृत्यू
3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राहू शाखेवर दरोडा
Just Now!
X