सांगली जिल्ह्य़ातील म्हैसाळ मिरज रस्त्यावर विक्रीसाठी स्वयंचलित कार्बाइन आणि पिस्तूल घेऊन आलेल्या दोघांना दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाने सोमवारी सकाळी अटक केली. त्यांच्याकडून एक कार्बाइन, तीन पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे असा एकूण चार लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुनील वामन भोसले (वय २६, रा. भिवर्गी, विजापूर, कर्नाटक) आणि शाहरूक महासूद संधे (वय २०, रा. आमनापूर, ता. पलूस, जि. सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना तपासासाठी न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती दहशतावादविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिली.
बर्गे यांनी सांगितले, की पुणे एटीएसच्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांना सांगली-कर्नाटक सीमेवर एक व्यक्ती कार्बाइन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांना दिल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एटीएसची तीन पथके त्या ठिकाणी पाठविण्यात आली. खबऱ्याने सांगितलेल्या म्हैसाळ-मिरज रस्त्यावरील राजेश पेट्रोलपंप या ठिकाणी कार्बाइनची विक्री होणार होती. त्या ठिकाणाची पथकाकडून पाहणी करून सापळा रचण्यात आला. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून दोन व्यक्ती पेट्रोल पंपासमोर आल्या. खबऱ्याने कार्बाइन घेऊन येणाऱ्या व्यक्ती त्याच असल्याचे सांगताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना पकडले. त्या वेळी आरोपी भोसलेकडे पांढऱ्या रंगाची बॅग होती. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये एक कार्बाइन आणि एक पिस्तूल मिळाले. दोन्ही आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या कमरेला प्रत्येकी एक पिस्तूल मिळाले. त्या दोघांकडून एक कार्बाइन, तीन पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे, मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यानुसार दोघांवर काळाचौकी पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते ही कार्बाइन साडेतीन लाख रुपयांना तर, पिस्तूल वीस हजार रुपयांना विक्री करणार होते.
भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आर्म अॅक्टसह सांगली, सोलापूर, कर्नाटकातील चडचण या ठिकाणी आठ गुन्हे दाखल आहेत. तर, संधेवर सांगलीमध्ये आर्म अॅक्टचा एक गुन्हा दाखल आहे. त्यांनी ही कार्बाइन मध्य प्रदेश चोपडा येथून आणल्याचे सांगत आहेत. त्यांनी यापूर्वी कर्नाटक, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी शस्त्रास्त्राची विक्री केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तच्या जवळ सापडलेली कार्बाइन कोणाकडून आणली होती ती कोणाला विक्री करणार होते. त्यांनी यापूर्वी कोणाला शस्त्र विक्री केली आहे. याचा तपास एटीएसकडून सुरू आहे. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.