राष्ट्रीय सुरक्षितता व दहशतवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) पुण्यासह पाच जिल्ह्य़ांतील पॅराग्लायडिंग शाळा व क्लबवर नजर ठेवली जाणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती एटीएस दर पंधरा दिवसाला तपासणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एटीएसकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे हे लष्कराच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय आहे. त्याबरोबरच येथे लष्कराचे सैनिकी तळ आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनाधिकृत रीत्या हवेत उडणारी प्रत्येक गोष्ट ही सुरिक्षतेतच्या दृष्टीने धोकादायक असू शकते. दोन वर्षांपूर्वी लोहगाव परिसरात आकाशात दोन अनोळखी दोन पॅराग्लायडर आढळून आले होते. त्याचा तपास सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांनी केला होता. पुणे जिल्ह्य़ात कामशेत, लोणावळा व इतर पाच जिल्ह्य़ांत अनेक पॅराग्लायडिंग क्लब व शाळा आहेत. या ठिकाणी दररोज अनेक जण पॅराग्लायडिंग करण्यासाठी येतात. पॅराग्लायडिंगचा दहशतवादी वापर करू शकतात, अशा सूचना अलिकडे गुप्तचर यंत्रणांकडून आल्या आहेत. त्यामुळेच यांच्यावर लष्कराच्या हवाई विभागाबरोबरच आता एटीएसकडूनही लक्ष ठेवले जाणार आहे. पुणे एटीएसच्या अधिपत्याखाली पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर असे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्य़ात असलेल्या सर्व पॅराग्लायडर क्लब व शाळांची माहिती सध्या गोळा केली जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची दर पंधरा दिवसाला एटीएसकडून माहिती मागविण्यात येणार आहे. त्याबरोबरच अधून-मधून एटीएसचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी देखील करणार आहेत. या सर्व क्लब व शाळांनी एटीएसला माहिती देणे बंधनकारक राहणार असल्याचे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत पॅराग्लायडिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनोज रॉय यांनी सांगितले, की पॅराग्लायडिंग क्लब व शाळा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून माहितीचा एक अर्ज भरून घेतला जातो. त्यासोबत पत्त्याच्या आणि ओळखपत्राचा पुरावा, दोन फोटे घेतले जातात. पॅराग्लायडिंगसाठी आलेली व्यक्ती ही परदेशी असेल, तर त्याचा व्हिसा तपासला जातो. देशात कोठेही पॅराग्लायिडग केल्यानंतर त्याची माहिती एकत्रित करण्याचे असोसिएशनचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पॅराग्लायडिंग करण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घ्यावी लागते. मात्र, आता असोसिएशनमार्फत अर्ज केल्यास परवानगी दिली जाईल. तसेच, या माहितीचे एकत्रित संकलन राहील, असे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.