पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर एका विद्यार्थ्याने प्राणघातक हल्ला केला आहे. हल्ल्यात मुलीच्या डाव्या हाताची करंगळी कापली गेली आहे. सुदैवानं ती शरीरापासून वेगळी झालेली नाहीत. पीडित मुलगी आणि प्राणघातक हल्ला करणारा विद्यार्थी हे येथील बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. जखमी झालेल्या मुलीचे नाव अश्विनी बोदकुरवार असून यवतमाळ येथील वणीचे भाजपचे आमदार संजीव बोदकुरवार यांची ती मुलगी आहे. राजेश बक्षी (वय २३) असे हल्ला करण्याऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा हरियाणाचा आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. ही घटना सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.अश्विनी ही सकाळी हॉस्टेलमधून महाविद्यालयात जात असताना बक्षीने तिचा पाठलाग करून तिच्यावर सत्तूर या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनी ही गंभीर जखमी झाली आहे. यामध्ये तिच्या डाव्या हाताची करंगळी तुटली. वाकडच्या बालाजी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून संशयित आरोपी बक्षीला ताब्यात घेण्यात आले आहे. अश्विनीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत. अश्विनी बालाजी महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेते. राजेशने अश्विनीवर हल्ला केल्यानंतर त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी त्याला पकडून त्याची धुलाई केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. तिथे उपस्थित असलेल्या एका युवकाने तिला वाचवण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. यामध्ये तो किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

घटनेची माहिती समजताच आमदार बोदकुरवार हे पुण्याकडे निघाले आहेत. अश्विनीने यासंबंधी कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, अशी माहिती आमदार बोदुकरवार यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.