पुणे : कोलकात्यातील रुग्णालयात दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांकडून संताप व्यक्त होत असतानाच पुण्यात देखील डॉक्टरांना धमकावण्याच्या, शाब्दिक हिंसाचाराच्या आणि प्रत्यक्ष शारीरिक हल्ल्यांच्या सुमारे पाचशेहून अधिक घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. पुण्यातील इनामदार रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात काम करत असलेल्या डॉ. सुशील कामतानी यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्थानकातच हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आयएमएतर्फे ही माहिती देण्यात आली. आयएमए पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, डॉक्टरांवर होणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हल्ले विचारात घेतले असता कमला नेहरू रुग्णालयात दर आठवडय़ातून दोनदा डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडतात. केईएम रुग्णालयात देखील आठवडय़ातून किमान एक हल्ल्याची घटना घडते. यापैकी अनेकदा शाब्दिक चकमक, धमकी देणे, भीती घालणे आणि प्रत्यक्ष मारहाण, शारीरिक हल्ला यांचा समावेश आहे.

आपल्याला याच ठिकाणी काम करायचे आहे या भीतीपोटी बरेच डॉक्टर प्रत्यक्ष तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. डॉक्टर तक्रार करणार याची कुणकुण लागली असता धमकावणारे लोकदेखील असल्याने तक्रार नोंदवण्याबाबत डॉक्टर साशंक असतात. यापुढे मात्र प्रत्येक हल्ल्याची नोंद व्हावी याबाबत आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्यासाठी डॉक्टरांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष हल्ल्यांची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नोंद व्हावी यासाठी पुढाकार घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे सदस्य डॉ. दिलीप सारडा म्हणाले, डॉक्टरांवरील हल्ले हा दखलपात्र गुन्हा ठरणे आवश्यक आहे. त्यासाठी या गुन्ह्य़ाला किमान सात ते चौदा वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणे महत्त्वाचे आहे. एकोणीस राज्यांनी डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधी कायदा संमत करूनही हा कायदा केंद्रात मंजूर झालेला नाही. त्यामुळे भारतीय पोलीस सेवेच्या अभ्यासक्रमात या कायद्याचा समावेश नाही. तो झाल्याशिवाय त्याची प्रभावी अंमलबजावणी शक्य नसल्याने हा कायदा केंद्रात मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या घटनांचे प्रमाण असेच कायम राहिल्यास कायमस्वरूपी बंद पुकारण्याची वेळ येईल.