पुणे : कबुतर पाळण्याचा शौक असलेल्या तिघांनी एका अल्पवयीन मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील जाधवनगर परिसरात घडली. अल्पवयीन मुलाने पाळीव  कबुतर पकडल्याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले.

या घटनेत रोहित भालशंकर (वय १६ , रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कबुतर पाळण्याचा शौक आहे. त्यांची वडगाव बुद्रुक परिसरात ढाबळ आहे. महिन्यापूर्वी आरोपींचे कबुतर भालशंकर याच्या घराजवळ आले होते.

भालशंकरने कबुतराला पकडून पिंजऱ्यात ठेवले होते. त्यामुळे आरोपी त्याच्यावर चिडून होते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपींनी भालशंकरला गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक ए. बी. काळे तपास करत आहेत.