पिंपरी : पिंपरी पालिकेतील कर्मचाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ओस पडलेली मुख्यालये तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचा राबता बराच वाढला आहे. परिणामी, नागरिकांची वर्दळही वाढू लागली आहे.

करोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागल्याने टाळेबंदीच्या काळात राज्य शासनाने सुरुवातीला कार्यालयांमधील उपस्थिती पाच टक्के ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. कालांतराने हे प्रमाण पाच टक्क्य़ांवरून १० टक्के करण्यात आले. राज्य शासनाच्या सुधारित आदेशानुसार पिंपरी-चिंचवडचा समावेश लाल क्षेत्राबाहेर (नॉन रेड झोन) करण्यात आल्यानंतर शहराला अनेक सवलती देण्यात आल्या. त्याअंतर्गत महापालिकेने कार्यालयातील उपस्थिती १०० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. यापुढे कार्यालयातील उपस्थिती १०० टक्के राहील, याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यायची आहे. तपासणी पथकाने अचानक तपासणी केल्यानंतर जागेवर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

महत्त्वाच्या सूचना

*  कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत सुरक्षित अंतर ठेवावे. कर्मचारी संख्या जास्त असणाऱ्या विभागात आवश्यकतेनुसार नियोजन करावे.

* नागरिकांना दुपारी २ ते ६ या वेळेतच प्रवेश मिळेल.

* महिला कर्मचाऱ्यांना उशिरा थांबवण्यात येऊ नये.

* महत्त्वाच्या कारणांशिवाय रजा मंजूर करण्यात येऊ नये.

* पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.